सोलापूर - आयुर्वेदिक औषधाने मुले होत असल्याचे सांगून एका कुटुंबाला तब्बल 3 लाख 19 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार करमाळा तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
या कटात सहभागी असलेले उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार आहेत. एकूण सहा आरोपीं पैकी संजय अण्णा धोत्रे (वय-45) व स्वामीनाथ सौदागर धुंडी (वय-42) तसेच पुष्कराज मदनदास शहा (वय-36) या तिघांना पोलिसांनी अधिक तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
काय आहे प्रकरण ?
कोळगाव येथील एका कुटुंबातील व्यक्तीस तीन बोगस डॉक्टरांनी आयुर्वेदीक औषधाने मुले होऊ शकतात, असे सांगून करमाळा, पुणे, अहमदनगर या ठिकाणांहून विविध औषधे खरेदी करण्यास भाग पाडले.
डॉ. सतीश शिंदे रा. (औरंगाबाद), डॉ. जाधव व डॉ. शिंदे (पैठण,औरंगाबाद) या बोगस नावाने त्यांनी पीडित कुटुंबाला मुलगा होईल, असे सांगून औषध घेण्यास प्रवृत्त केले.
अहमदनगरमधील पतंजली आयुर्वेदिक जडीबुटी केंद्रातून एक लाख रुपये, बालाजी आयुर्वेदिक मेडिकल (पुणे) येथून एक लाख 97 हजार रुपये व कृष्णार्पण मेडिकल (करमाळा) येथून 22 हजार रुपयांची औषधे खरेदी करायला लावली. तसेच पीडित महिलेला गर्भ वाढीसाठी 6 लाख 40 हजार रुपयांची औषधे खरेदी करण्यास प्रवृत्त केले.
यानंतर, फिर्यादीला संशय आल्याने त्यांनी औषधे खरेदी करण्याचे टाळले; व पोलिसांशी संपर्क साधला. याबाबत करमाळा पोलिसात 2 ऑक्टोबरला कलम 420, 384, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत उपविभाग पोलीस अधिकारी विशाल हिरे, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सापळा रचला. पैठण व औरंगाबादला जाऊन तपास केल्यानंतर संबंधित नावांच्या व्यक्ती या ठिकाणी नसल्याचे निदर्शनास आले. यानंतर करमाळा पोलिसांना उपलब्ध झालेल्या लोकेशन वरून तपास करून जालन्यातून दोघांना, तर तिसऱ्या आरोपीला करमाळ्यात अटक करण्यात आली. या संशयिताना बार्शी येथील न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
यामध्ये पुष्कराज मदनशहा कडून बावीस हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, उर्वरित आरोपींना लवकरच जेरबंद करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी सांगितले.