सोलापूर - जिल्ह्यात आतापर्यंत 19 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या 19 जणांची तिसरी कोरोना चाचणी निगेटीव्ह आली असून सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. सोलापूरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असताना कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. ही बाब नागरिकांना दिलासा देणारी आहे.
हेही वाचा... व्हिडिओ : 'तुमच्या अंगातील मस्ती पाहून मला भयंकर राग येतोय' कोरोनाबाबत चिमुकलीने नागरिकांना खडसावले
सोलापूरात आत्तापर्यंत एकून 114 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. यापैकी 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. 108 जणांवर सोलापूरातील शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात येते होते. यापैकी 19 जणांनी कोरोनावर मात केली आहे. या 19 नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी शासकीय रूग्णालयात राहून योग्य ते उपचार घेतले. डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन केले. त्यामुळे या रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना आता घरी सोडण्यात आले आहे.
या 19 रुग्णांपैकी 10 जणांना दोन दिवसापूर्वीच घरी सोडण्यात आले आहे. तर, काल रात्री 9 जणांना घरी सोडण्यात आले आहे. सोलापूरात अजूनही 89 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. आणखी काही लोकांचे अहवाल प्रतिक्षेत असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.