सोलापूर - कोरोना व्हायरसच्या भितीमुळे इराक आणि इराण या देशांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. यामुळे तीर्थ यात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील ६०० भाविक इराणच्या तेहेरानमध्ये अडकले आहेत. यात अकलूजचे १२ तर सांगोला तालुक्यातील १४ भाविकांचा समावेश आहे.
शिया पंथियांसाठी पवित्र मानल्या गेलेल्या इराक आणि इराणमधल्या धर्मस्थळांच्या दर्शनासाठी हे भाविक तिथे गेले होते. त्याच दरम्यान कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने त्या देशांनी आपल्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. यामुळे हे भाविक तेहेरानमध्ये अडकले आहेत. आम्हाला तातडीने मायदेशी आणा, असे आवाहन या भाविकांनी भारत सरकारला केले आहे. कोल्हापूरमधल्या साद टूर्स कंपनीने ही सहल आयोजित केली होती.
दरम्यान जगातील तब्बल ४८ देशांतील नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यापैकी ४० हून अधिक देशांनी हाय अलर्ट घोषित केलं आहे. आतापर्यंत कोरोनामुळे दोन हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर हजारोंना यांची लागण झाली आहे. चीननंतर दक्षिण कोरिया आणि इराणमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.
दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने जगातील सर्व देशांना कोरोना व्हायरस रोखण्यासाठी योग्य ते पाऊल उचलण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना हा आजार बरा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आले आहे.