सोलापूर - जिल्ह्यात कोरोना लस देण्याबाबत जिल्हा प्रशासनाची तयारी झाली असून ही लस प्रथम शासकीय आणि खासगी आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांना देण्यात येणार आहे. लसीकरणामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईनचे कर्मचारी, 50 वर्षांवरील नागरिक आणि कोमॉर्बिड रूग्ण असे चार टप्पे केल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. पहिल्या टप्प्यात 30 हजार 284 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.
16 डिसेंबरपर्यंत नियोजन
जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, की कोरोनाला हरविण्यासाठी लसीकरण आणि औषधाशिवाय पर्याय नाही. समाजामध्ये लसीकरणाबाबत जागरूकता आणण्यासाठी सर्व क्षेत्रातील व्यक्तींना बैठकीसाठी बोलावण्यात येणार आहे. लसीकरणाचा आराखडा आणि नियोजन अचूक होण्यासाठी प्रयत्न करावेत. लस देण्यासाठी डाटा फिडिंगच्या कामाला गती देऊन त्वरित पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सर्व नियोजन 16 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
300 बूथचे नियोजन केले तरच मिळणार लस
जिल्ह्यात 300 बूथचे नियोजन करून आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असेल तरच त्यांना लस मिळेल. शासकीय आणि खासगी आरोग्य संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा डाटा अचूकपणे द्यावा. शंभरकर यांनी लसीकरणासाठी लागणाऱ्या कोल्ड चैनविषयी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. लसीकरणावेळी सुरक्षेसाठी पोलीस, एनसीसी यांची सुरक्षा घेता येईल, यावर चर्चा झाली.
प्रत्येक बूथवर 100 जणांना दिली जाणार लस
18 डिसेंबरला प्रशिक्षण होणार असून एका बूथवर 100 जणांनाच लस दिली जाईल. याठिकाणी विविध पाच प्रकारचे सदस्य असणार आहेत. लसीकरणादिवशी गर्दी, गोंधळ होऊ नये, यासाठी ज्यांना लस दिली जाणार आहे, त्यांना लसीकरणाचा दिवस एसएमएसद्वारे कळविला जाणार आहे. लस दिल्यानंतर त्या व्यक्तीला अर्धा तास वेटिंग रूममध्ये थांबण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
पोलिओ लसीचेदेखील नियोजन
डॉ. अनिरूद्ध पिंपळे यांनी पोलिओ लसीकरणाबाबत माहिती दिली. 17 जानेवारीला पोलिओची लस 3 लाख 44 हजार पाच वर्षाच्या आतील बालकांना दिली जाणार आहे. यासाठी 2449 लसीकरण केंद्र, 338 टीम तयार करण्यात आल्या आहेत.