पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघातील पोट निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणूकीत कोविड रुग्ण, दिव्यांग आणि ऐंशी वर्षावरील जेष्ठ नागरिकांना टपालाव्दारे मतदान करता येणार आहे. मतदारसंघात 13 हजार जेष्ठ नागरिक असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात 17 एप्रिलला मतदान होणार असून मतदानाची वेळ सकाळी 7.00 ते संध्याकाळी 7.00 वाजेपर्यंत असणार आहे.
पोट निवडणुकीसंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक -
पंढरपूर निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक झाली. यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी ही माहिती दिली. पंढरपूर येथे बैठक झाली असून बैठकीला सह मुख्य निवडणूक अधिकारी अ.ना.वळवी, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
निवडणुकीच्या कामासाठी असणाऱ्या अधिकाऱ्यांची तपासणी होणार
पंढरपूर मंगळवेढा निवडणूक कोरोनाच्या कालावधीत होत असल्याने आव्हानात्मक आहे. मात्र, याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांचे काटेकोपणे पालन करुन निवडणूक पार पाडली जाईल. मतदान केंद्रावर कोरोनाबाबत पुरेपुर काळजी घेतली जाणार आहे. आरोग्य पथक तैनात केले जाणार आहे. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधिक लस दिली जाणार आहे. निवडणूकीचे काम काटेकोरपणे व्हावे यासाठी सर्व अधिकारी आणि विभागांनी नेमून दिलेले काम करावे अशा सूचना देशपांडे यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या.
मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती करणार -
मतदार संघामध्ये पाच आणि पाच पेक्षा जास्त मतदान केंद्र असणाऱ्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. तेथे अधिकारी कर्मचारी वर्ग नियुक्त करावा अशा सूचना देशापांडे यांनी केल्या. वाढलेल्या मतदान केंद्रावर सूक्ष्म निरिक्षकांच्या नियुक्तीची आणि त्यांच्या प्रशिक्षणाची कार्यवाही करावी. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदार जागृतीसाठी अभिनव कल्पनांचा वापर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी राजकीय पक्षांनी लोकांना आवाहन करावे. निवडणूक पारदर्शी आणि भयमुक्त वातावरणात होण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देशपांडे यांनी राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत केले. आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.