सोलापूर - सोलापूर शहरासह जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दोन सदस्यांचे केंद्रीय पथक काल गुरुवारी सोलापुरात दाखल झाले होते. पाच दिवस मुक्कामी राहून, अभ्यास करून ते प्रशासनाला योग्य त्या सूचना करणार होते. मात्र या पथकातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी महिती दिली आहे. डॉ. ए .जी. अलोन असे या कोरोना पॉझिटिव्ह सदस्याचे नाव आहे.
एक सदस्य पॉझिटिव्ह, तर दुसरा सदस्य क्वारंटाईन
जिल्ह्यात दररोज 500 हून अधिक कोरोना रुग्णांची भर पडत आहे. या कोरोना वाढिचा अभ्यास करण्यासाठी दोन सदस्यांचे केंद्रीय पथक पाच दिवसांसाठी सोलापूर दौऱ्यावर आले होते. मात्र पुण्यावरून वाहनातून येणाऱ्या या पथकाचा वाहनचालक गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर त्या दोन सदस्यांची आज शुक्रवारी कोरोना टेस्ट घेण्यात आली. त्यापैकी एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर दुसरे सदस्य डॉ. पियुष जैन हे होम क्वांरटाईन आहेत.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली
सोलापुरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दररोज पाचशेपेक्षा अधिक रुग्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आढळत आहेत. मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढू लागले आहे. बार्शी, पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा या तालुक्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक जिल्ह्यात दाखल झाले होते, मात्र त्यातील एका सदस्याला कोरोना झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रातील कारागृहामध्ये प्रमाणापेक्षा अधिक कैदी; 2978 कैद्यांना कोरोना, 7 जणांचा मृत्यू