सोलापूर - सोलापुरात कोरोबाधित रुग्णांचा विस्फोट सुरूच आहे. शुक्रवारी ग्रामीण भागात 1,966 तर महापालिका हद्दीत 157 अशा एकूण 2,123 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागातील 42 तर महापालिका हद्दीतील 14 अशा एकूण 56 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आजच्या अहवालातून समोर आले आहे.
सोलापुरात आजही मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह रुग्ण -
सोलापूर जिल्हा व शहरी भागातील विविध रुग्णालयात सध्या 19 हजार 352 अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये 17,519 रुग्ण हे ग्रामीण भागातील तर 1,773 रुग्ण हे महापालिका हद्दीतील आहेत. आज एकाच दिवशी सोलापुरात 1434 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 1308 तर महापालिका हद्दीतील 126 रुग्णांचा समावेश आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या आता एक लाख 14 हजार 508 झाली आहे. त्यातील 88 हजार 26 रुग्ण हे ग्रामीण भागातील तर 26 हजार 482 रुग्ण महापालिका हद्दीतील आहेत. त्यापैकी 92 हजार 71 जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सोलापुरात कोरोनामुळे आतापर्यंत 3 हजार 85 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 1860 जण हे ग्रामीण भागातील 1225 हे महापालिका हद्दीतील आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात एकाच दिवशी 556 नवे कोरोना बाधित -
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज नव्याने आढळलेल्या 1966 कोरोनाबाधित रुग्णांमधील 556 रुग्ण हे एकट्या माळशिरस तालुक्यातील आहेत. अक्कलकोट तालुक्यातील 54, बार्शी तालुक्यातील 106, करमाळा तालुक्यातील 242, माढा तालुक्यातील 284, मंगळवेढा तालुक्यातील 82, मोहोळ तालुक्यातील 131, उत्तर सोलापूर तालुक्यातील 55, पंढरपूर तालुक्यातील 353, सांगोला तालुक्यातील 29, दक्षिण सोलापूर तालुक्यातील 74 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 'या' चार तालुक्यात प्रत्येकी सहा मृत्यू -
ग्रामीण भागातील 42 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अक्कलकोट, माळशिरस, मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूर या चार तालुक्यातील प्रत्येकी सहा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मोहोळ तालुक्यातील सात, बार्शी तालुक्यातील पाच, करमाळा तालुक्यातील तीन, उत्तर सोलापूर तालुक्यातील एक व पंढरपूर तालुक्यातील दोन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.