सोलापूर - सोलापुरातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस व नगरसेवक यांच्या माध्यमातून दवंडी वाजवून घरात बसा, विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन करत जनजागृती रॅली काढण्यात आली आहे.
जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बुधवारी (दि. 22 जुलै) सकाळ पासून दिवसभर आधुनिक पद्धतीने मोबाईलवरुन स्पीकर द्वारे दवंडी वाजवून जनजागृती करण्यात आली. दत्त नगर, दाजी गणपती, मार्कंडेय रुग्णालय परिसर, विनोबा झोपडपट्टी, कुचन नगर, दत्त नगर, मुस्लीम पाच्छा पेठ आदी परिसरात पोलिसांच्या मोबाईल स्पीकरद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात आले.
प्रबोधन करत, विना कारण घराबाहेर पडू नका, ज्यांना रुग्णालयात जायचे आहे, त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क करा. पोलीस ठाण्यातर्फे रुग्णांना दवाखान्यात पोहोचवण्यात येईल. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व आपल्या सर्वांच्या हितासाठी सोलापुरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे विणाकारण घराबाहेर पडू नका, वारंवार हात स्वच्छ धुवत चला, मास्कचा वापर करा, असे आवाहन करण्यात येत होते.
यावेळी नगरसेवक नागेश वल्याळ, नगरसेवक दत्तू पोसा, नागेश बोमड्याल, आनंद बिरु, विष्णू कारमपुरी, गौरीशंकर कोंडा, जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरीक्षक जफर मोगल, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार, पोलीस उपनिरीक्षक देविदास करंडे यांच्यासह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रबोधनपर रॅलीची सुरुवात दत्तनगर येथील दाजी गणपती मंदिर येथून झाली. मार्कंडेय रुग्णालय, विनोबा झोपडपट्टी, कुचन नगर, माकप कार्यालय, पाच्छा पेठ मार्गे ही रॅली काढण्यात आली.