सोलापूर- येथील बाजार समितीसमोरुन मंगळवारी (दि.21 जुलै) पहाटे कंटेनर पळवून घेऊन जाणाऱ्या संशयित चोरट्यांना जोडभावी पोलिसांनी काही तासांतच अटक करून त्यांना जेरबंद केले आहे. कंटेनरमधील 39 लाखांचे एमआरएफ कंपनीचे टायर व 11 लाख रुपयांचे कंटेनर ट्रक, असा एकूण 50 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. यामध्ये चार संशयित आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करुन तपास सुरू असल्याची माहिती जोडभावी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शिवशंकर बोंदर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना माहिती दिली.
याबाबत कंटेनर चालक शिवकुमार शांतकुमार यादव (रा. उन्नाव, उत्तर प्रदेश) यांनी मंगळवारी सकाळी जोडभावी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी राजू राठोड, संतू राठोड (दोघे रा .विडी घरकुल), सोहेल शेख (रा. नई जिंदगी), बाबा शेख (रा. मंगळवेढा) या आरोपींना अटक केली असून चौघे पोलीस कोठडीत आहेत. त्यांनी या गुन्ह्यात एका पिस्तुलाचा वापर केला असून त्याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली आहे.
मंगळवारी (दि. 21 जुलै) पहाटे 3 वाजण्याच्याच्या सुमारास हा कंटेनर (क्र. एम एच 46 बी बी 8589) 39 लाखांचे टायर घेऊन गोव्याहून सोलापूर येथे आला होता. बाजार समिती समोर अचानक तीन संशयित आरोपी यांनी दुसऱ्या एका ट्रकमधून त्यांचा पाठलाग करत त्यासमोर ट्रक आडवा लावून कंटेनर थांबविला. त्यानंतर कंटेनर चालक व क्लिनरला मारहाण करून शिवागीळ करत दोघांचे हात पाय बांधून कंटेनर घेऊन हैदराबाद महामार्गाने निघाले. कंटेनर चालक शिवकुमार यादव व त्याचा जोडीदार क्लिनर या दोघांना बोरामणी विमानतळ येथील मोकळ्या जागेत फेकून देत कंटेनर घेऊन पसार झाले. त्यांनी याबाबत जोडभावी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत कंटेनरचा शोध लावला. एका खबऱ्या मार्फत माहिती मिळवली की, चोरी झालेला कंटेनर हा मंगळवेढा येथील कचरा वस्ती येथे आहे. पोलिसांनी ताबडतोब कंटेनर तब्यात घेऊन तेथून बाबा शेख याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सोहेल शेख याला नई जिंदगी येथून ताब्यात घेतले. त्यानंतर संतू राठोड व राजू राठोड यांना विडी घरकुल परिसरातून अटक करण्यात आली. या चोरीमध्ये तिघा आरोपिंनी पिस्तुलाचा धाक दाखवत हा कंटेनर पळविला होता. पोलीस ती पिस्तुल घेण्यासाठी तपास करत आहेत. ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक बोराडे, पोलीस हवालदार विष्णू गायकवाड, पोलीस नाईक प्रकाश गायकवाड, पोलीस शिपाई सैपन सय्यद आदींनी केली.