सोलपूर : मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून जागेवरून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराविरुध्द समाधान आवताडे, शैला गोडसे तर आघाडीतील जागेच्या वादावरून आमदार भालके विरोधात शिवाजी काळुंगे यांनी अर्ज दाखल केल्याने यात कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवार आपआपल्या मुद्यावर ठाम राहिले तर पाडापाडीच्या राजकारणाची सुरुवात होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात धाकधूक सुरू झाली आहे. दरम्यान, काँग्रेसचे शिवाजीराव काळुंगे हे काल दिवसभर मोबाईल बंद करून अज्ञातस्थळी गेले असल्याची चर्चा मतदारसंघात होती. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी अर्ज माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी याआधीच स्पष्ट केली आहे. मात्र, आता दाखल अर्जावर पक्षश्रेष्ठी काही तोडगा काढतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - तुम्ही मला माझ्या विकास कामांमुळे नाकारणार नाही - नारायण पाटील
शिवसेनेच्या जागेत वरिष्ठ पातळीवरून तडजोड करत ही जागा रयत क्रांती संघटनेच्या सुधाकरपंत परिचारक यांना देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून आमदारकीसाठी तयारी केलेल्या शैला गोडसे यांचे समर्थक नाराज होते. गत निवडणुकीत 43000 मते घेणारे समाधान आवताडे यांनी निवडणुकीनंतर यंदाही आमदारकीचे तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पक्षाने संधी न दिल्याने त्यांनीदेखील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अर्ज दाखल केला आहे. आघाडीच्या जागावाटपात ही जागा काँग्रेस पक्षाकडे असल्याने शिवाजीराव काळुंगे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, व पक्षाकडे पाठपुरावा करून ए.बी.फार्म जोडून अखेर ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार झाले. युतीतील बंडखोरीमुळे पक्षाच्या उमेदवाराची अडचण झाली आहे. तर, आघाडीतील दोघांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या आ.भालके यांच्या समोर अडचण निर्माण केली आहे. यातच राष्ट्रवादीने सोलापूर शहरमध्ये आपला उमेदवार उभा केला आहे.
आज उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्यामुळे वरिष्ठ पातळीवरून युती आणि आघाडीतील नेते यावर तोडगा काढतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. उमेदवार माघार घेणार की, आपला अर्ज कायम ठेवणार हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे.