पंढरपूर (सोलापूर) - वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालय व इन्कम टॅक्स विभागाकडे लेखी तक्रार देण्यात आली आहे. सिताराम महाराज साखर कारखान्याच्या विक्रीमध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी कल्याणराव काळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती परिषदेमध्ये दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यामुळे अंतर्गत युद्ध पेटले आहे.
कल्याणराव काळे यांच्याकडून सभासदांची फसवणूक -
खर्डी येथील सीताराम महाराज साखर कारखान्यातील सभासदांची फसवणूक झाली आहे. सीताराम महाराज कारखाना सुरू झाल्यापासून कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार झाले आहेत. या कारखान्यावर राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे प्रशासक म्हणून काम करत होते. सन 2010 ते 2015 या दरम्यान सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याकडे ऊस दिलेल्या शेतकरी, कामगार, ट्रॅक्टर मालक, व्यापारी व शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांकडून शेअर्स देतो म्हणून सुमारे 35 कोटी रुपये गोळा केले आहेत. दहा वर्षांमध्ये शेतकरी सभासदांना कोणत्याही प्रकारचा परतावा दिला गेल्याचा आरोप दीपक पवार यांनी केला.
हे ही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची २४ कोटी ६३ लाखांची फसवणूक
ईडी, आयटी, सेबी इत्यादी संस्थेकडे लेखी तक्रार -
सीताराम महाराज साखर कारखान्यामध्ये कल्याणराव काळे यांच्यासह संचालक व कार्यकारी संचालक यांनी हजारो लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे. यासंदर्भातील सर्व कागदपत्रे गोळा करून कारखान्याच्या सर्व आर्थिक व्यवहाराची कसून चौकशी करावी, अशी लेखी तक्रार त्यांनी ईडी, आयटी, सेबी आदी संस्थांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. लवकरच याप्रकरणाची चौकशी सुरु केली जाईल, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. चौकशीनंतर काळे यांचा मोठा आर्थिक घोटाळा समोर येईल, असेही पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.