सोलापूर- अकलूज येथे होणारी नरेंद्र मोदी यांची सभा ही नियमबाह्य आणि बेकायदेशीर असून निवडणूक आयोगाने या सभेला परवानगी देऊ नये, अशी तक्रार काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी ही तक्रार केली आहे.
बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकलूज येथे सभा होणार आहे. मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नरेंद्र मोदी यांची सभा अकलूज येथे ठेवण्यात आली आहे. मात्र, १७ तारखेला ठेवण्यात आलेली मोदींची सभा ही नियमबाह्य असल्याची तक्रार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. दिनांक १८ एप्रिल रोजी सोलापूर लोकसभेसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे मतदानाच्या एक दिवस अगोदर कोणालाही प्रचार सभा घेता येत नाही. हा नियम दाखवत जिल्हा काँग्रेस कमिटीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
कुठल्याही नियमाचा भंग होत नसल्याचा भाजपचा दावा
मोदी यांची सभा ही १७ एप्रिल रोजी आहे आणि सोलापूर लोकसभेचे मतदान हे 18 एप्रिल रोजी होत आहे. यामध्येही तांत्रिक मुद्दा असा आहे की, मोदी यांची सभा ही अकलूज येथे होत आहे. मात्र, अकलूज हे ठिकाण सोलापूर लोकसभा मतदारसंघात येत नसून ते माढा लोकसभा मतदारसंघातील ठिकाण आहे. आणि माढा लोकसभेचे मतदान हे २३ एप्रिल रोजी आहे. त्यामुळे कुठल्याही नियमाचा मंग होत नसल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.
तक्रारीवर निवडणूक आयोगाचे अद्याप स्पष्टीकरण नाही
माढा आणि सोपालापूर मतदारसंघ एकाच सोलापूर जिल्ह्यात आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात १८ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाच्या फक्त काही तास अगोदरच मोदींची सभा घेणे हे चुकीचे असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे मतदारसंघ जरी वेगळा असला तरी मोदींची सभा सोलापूर जिल्ह्यातच होत असल्यामुळे आणि शंभर किलोमीटर अंतर असल्यामुळे या सभेला निवडणूक आयोगाने परवानगी देऊ नये, अशी तक्रार करण्यात आली आहे. काँग्रेस कडून तक्रार करण्यात आली असली तरी अद्याप त्यावर निवडणूक आयोगाने कोणतेही स्पष्टीकरण दिले नसल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी सांगितले आहे.