पंढरपूर - माळशिरस तालुक्यातील अकलूज, नातेपुते, माळीनगर या ग्रामपंचायतींचे नगरपंचायत व नगरपालिकेत रुपांतर करावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान मागणी मान्य न झाल्यास ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराजांची पालखी तालुक्यातून जाऊ देणार नाही, असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे.
धैर्यशील मोहिते पाटलांचा सरकारला इशारा
माळशिरस तालुक्यातील अकलूज, नातेपुते, माळीनगर या ग्रामपंचायतींचे रुपांतर नगरपंचायत व नगरपालिकेत करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे. मात्र 2018 पासून प्रस्ताव प्रलंबित आहे. मोहिते पाटील घराण्याने भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे जर माळशिरस तालुक्यातील जनतेला त्रास होणार असेल, तर त्रास खपवून घेतला जाणार नाही असा इशारा भाजपा नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला आहे.
'राजकीय द्वेषातून गावांवर अन्याय'
अकलूज, नातेपुते व माळीनगर या ग्रामपंचायतींचे नगरपंचायत व नगरपालिकेत रुपांतर व्हावे, यासाठी ग्रामस्थ गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकार राजकीय द्वेषातून हा प्रस्ताव प्रलंबित ठेवत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय द्वेषातून हे घडत आहे. राजकारणामुळे तालुक्यावर अन्याय होत आहे, असा आरोपही यावेळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी प्रलंबित प्रस्तावावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी संबंधीत ग्रामस्थांनी केली आहे.
हेही वाचा - ...म्हणून हिवरे बाजारातील शाळा राहणार सुरू