सोलापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सकाळी अक्कलकोटमधील अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. केंद्र सरकारने राज्य शासनाची रक्कम वेळीच दिली तर, राज्य शासनाला शेतकऱ्यांना मदत करण्यास विलंब होणार नाही. तरी देखील हा दौरा दिलासा दौरा आहे. पाहणी सुरू झाली असून मदतीला देखील सुरुवात झाल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच आम्ही कोणत्याही अहवालाचा अभ्यास करणार नसून थेट मदत करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. जीवितहानी होणार नाही, याची काळजी घ्या, पंचनामे सुरू झालेत, लवकरच मदत येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. तर, सांगवी खुर्द, बोरी उमरगे, रामपूर येथील पाहणीवेळी 'गाव पुनर्वसन करा साहेब... गाव पुनर्वसन करा...' अशी घोषणा देण्यात आली.
मुख्यमंत्री दौऱ्यात सोशल डिस्टन्सचा फज्जा
मुख्यमंत्री दौऱ्यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. सांगवी, रामपूर,आणि बोरी उमरगे येथे निवेदन देण्यासाठी आणि धनादेश घेण्यासाठी झुंबड उडाली होती. कोरोना महामारीची भीती कोणालाही नव्हती.