पंढरपूर - उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील स्थापन झालेल्या राज्य सरकारने सर्व देऊळ कुलूप बंद करून ठेवले आहेत. तसेच आषाढी वारीवरही शासनाकडून कडक निर्बंध टाकण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाच्या महापूजेला येण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
विश्व हिंदु परिषदेचा मुख्यमंत्र्यांना इशारा -
राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी सोहळ्यावर बंदी घातली आहे. जिल्हा प्रशासनाकडून आषाढीवारी प्रातिनिधिक स्वरूपाचा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 20 जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी पंढरपूरात येणार आहे. त्या विश्व हिंदु परिषदेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वारीला येऊ दिले जाणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे. तर जिल्हा प्रशासनाकडून पंढरपूरसह तालुक्यात नऊ दिवसाची संचारबंदी लागू केली आहे.
'नाना पटोलेंच्या वक्तव्याला पक्षात किंमत नाही' -
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नाना कळा आहेत. ते सकाळी एक बोलतात, दुपारी दुसरेच बोलतात तर रात्री घुमजाव करतात. त्यामुळे त्यांचे वक्तव्य किती गांभीर्याने घ्यायचे हा विषय आहे, तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त होते. मात्र, त्यांच्या वक्तव्याला त्यांच्या पक्षातच किंमत दिली जात नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसबाबत नाना पटोले यांचे वक्तव्य काँग्रेससाठी बरोबर असल्याचे प्रतिपादन विरोधीपक्षनेते दरेकर यांनी केले.
'मुंबई लोकल सुरू करा अन्यथा 'रेलरोको' -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबई लोकल बंद केली आहे. आजही ज्या मुंबईकरांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. त्यांना लोकल सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक नाही. सध्याच्या परिस्थितीत मुंबईमध्ये नागरीक कोरोनाने मरतील की उपासमारीने मरतील, अशी वेळ आली आहे. उपनगरातील लोकल चालू झाली पाहिजे. राज्य सरकारने टप्प्या-टप्प्याने लोकल सेवा चालू केली पाहिजे, जर राज्य सरकारने लोकल सेवा लवकरच सुरू केली नाही, तर भारतीय जनता पार्टीकडून मी स्वतः 'रेलरोको आंदोलन' करणार असल्याचा इशारा प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.
'सरकार मोठ्या लोकांचे चोचले पुरवते आहे' -
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात गोरगरिबांच्या कल्याणासाठी योजना चालू केल्या होत्या. मात्र, त्या योजना बंद करून महाविकास आघाडी सरकार हे मोठ्या लोकांचे चोचले पुरवण्याचे काम करत आहे. कोरोनामुळे वंचित घटक हा मदतीपासून वंचित आहे. मात्र, वंचित घटकाला भारतीय जनता पार्टी न्याय देण्याचे काम करेल, असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील इमारतीला भीषण आग, सुदैवाने जीवित हानी नाही