पंढरपूर (सोलापूर) - श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये माघ शुद्ध तिसऱ्या दिवशी औसेकर घराण्यातून 242 वर्षांपासून भव्य दिव्य अशी चक्री भजनाची परंपरा आहे. माघ शुद्ध महिन्यामध्ये औसेकर घराण्याकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या सेवार्थ चक्रीभजन केले जाते. या चक्रीभजनसाठी राज्यातून सुमारे अडीच ते तीन हजार भाविक आनंद घेतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चक्रीभजन प्राथमिक स्वरूपात करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
औसेकर घराण्याची 242 वर्षाची परंपरा
औसेकर घराण्याची 1792 सालापासून माघ वारी काळात श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या सेवार्थ चक्री भजनाची परंपरा आहे. देगलूरकर महाराजांच्या काळापासून चक्री भजनाची परंपरा सुरू आहे. गेल्या 242 वर्षापासून ही सेवा अखंडपणे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी देण्याचे काम औसेकर घराण्यातून केली जाते. या चक्री भजनाच्या माध्यमातून अनोखी सेवा दिली जाते. या चक्री भजनाच्या माध्यमातून 14 भजन म्हणले जातात. ह्या चक्री भजनाच्या पोषाखाचे खास वैशिष्ट्य आहे. चक्री भजनामध्ये वारकरी संप्रदाय पूर्णपणे रंगून जात असतो.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परंपरा अखंडित चालू
कोरोना संसर्ग विषाणूमुळे माघी यात्रा रद्द करण्यात आली. यामुळे औसेकर घराण्याकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी दिली जाणारी चक्री भजनाची परंपरा होणार का नाही असे वाटत होते. मात्र, मंदिर समितीने प्राथमिक स्वरूपाची चक्रीभजन करण्याची परवानगी दिली. त्यामुळे गुरुबाबा औसेकर महाराज यांनी चक्री भजन सादर करून ही परंपरा कायम राखली आहे. या चक्री भजनामध्ये अकरा सदस्य होते. यामुळे 242 वर्षाची परंपरा अखंडित चालू राहिली.
कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन
आषाढी, कार्तिकी, माघ वारी सोहळा कोरोना विषाणू वेळ रद्द करण्यात आला. मात्र चक्री भजनाच्या कार्यक्रमाच्या वेळेस मंदिर समितीकडून कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन होताना दिसून आले. यामध्ये मोजक्याच नागरिकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला.
हेही वाचा - श्री विठ्ठल-रुक्मिणी देवता परिवारातील मंदिराचे अन् सभा मंडपाचे जीर्णोद्धार होणार