सोलापूर(पंढरपूर) - सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. असे असतानाही पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी येथे उपसभापती म्हणून निवडून आलेल्या राजेश्री भोसले यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. त्या मिरवणुकीमध्ये डीजे आणि जेसीबीच्या सहाय्याने गुलालाची उधळण झाली. ही मिरवणूक काढणे महागात पडले आहे. याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी 76 जणांवर गुन्हा नोंदवला आहे.
तालुका पोलीस ठाण्यात 76 जणांवर गुन्हा दाखल -
पंढरपूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी राजश्री भोसले यांची तीन मार्च रोजी निवड झाली. त्यांच्या पतीसह कार्यकर्त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही ओझेवाडी गावात गर्दी करून जंगी मिरवणूक काढली. या मिरवणुकीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याचाच आधार घेत पोलीस निरीक्षक अवचर यांनी राजश्री भोसले, त्यांचे पती पंडित राव भोसले व अन्य 75 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
पंढरपूर तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ -
पंढरपूर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची पर्वा न करता पोलीस व राजकीय नेत्यांसारखे जबाबदार नागरिक देखील नियम पायदळी तुडवत आहेत. मिरवणुकांमध्ये गर्दी केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पोलीस व राजकारण्यांनी सामाजिक भान राखून या गोष्टींना प्रतिबंध करणे गरजेचे आहे.