सोलापूर- राज्य शासनाच्यावतीने 'हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची' ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत उत्तर सोलापूर तालुक्यातील महिला बचत गटांमध्ये काम करणाऱ्या नवउद्योजक महिलांच्या नाविन्यपूर्ण कल्पना जाणून घेऊन त्यांना आर्थिक पाठबळ देण्यात येणार असल्याची माहिती, उत्तर सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समाधान नागणे यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील नव उद्योजक महिलांना प्रोत्साहन मिळावे आणि नाविन्यपूर्ण उद्योग करणाऱ्या महिला तयार व्हाव्यात, यासाठी राज्य सरकारच्या किमान कौशल्य विकास विभागाच्यावतीने ही योजना चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील दहा महिला नवउद्योजकांना शोधून त्यांच्या नाविन्यपूर्ण अशा उद्योगाला आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातून निवडण्यात आलेल्या १०९ उद्योजक महिलांना त्यांचा उद्योग जिल्हा पातळीवर पाठविण्यासाठी संधी मिळणार आहे. तसेच जिल्हा पातळीवर निवड झालेल्या नवीन उद्योजकांना या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ मिळणार आहे.
ग्रामीण किंवा शहरी भागांमध्ये अनेक महिला नावीन्यपूर्ण उद्योग करत आहेत. मात्र महिलांना उद्योग व्यवसायासाठी आर्थिक भांडवल कमी पडत असल्यामुळे त्यांचे उद्योग वाढीस लागत नाही अशी खंत, महिला बचत गटांनी व्यक्त केली आहे. आर्थिक पाठबळ मिळावे यासाठीच या योजनेमध्ये आम्ही सहभागी झालो असल्याचे बचत गटांच्या महिलांनी 'ईटीव्ही भारतशी' बोलताना सांगितले आहे.