पंढरपूर - महावितरणच्या गलथान कारभारमुळे करमाळा तालुक्यातील पोंधवडी येथे दोन एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. शेतकरी बाबुराव दगडू कोडलिंगे यांच्या उसाच्या शेतातून गेलेल्या वीजवाहक तारांचे घर्षण झाले. त्यामुळे आग लागून तोडणीस आलेला 2 एकर ऊस जळून खाक झाला आहे. यामध्ये जवळपास 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
तक्रारी करुनही वीजवितरण कंपनीचे दुर्लक्ष
पोंधवडी परिसरात काही शेतकऱ्यांच्या शेतातून वीजवितरण कंपनीच्या वीजवाहक तारा गेल्या आहेत. परंतु या वीजवाहतक तारा जुन्या आणि कुचकामी झाल्या आहेत. शिवाय त्या खाली लोंबत असल्याने घर्षण होऊन आग लागण्याचे प्रकार घडले आहेत. अनेकवेळा तक्रारी करूनही वीजवितरण कंपनीने याकडे लक्ष दिले नाही.
ऊस, ठिबक सिंचन व पाइपलाइनचे मोठे नुकसान
९ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास खाली लोंबत असलेल्या तारांचे घर्षण झाले. या घर्षणामुळे लागलेल्या आगीत दोन एकर शेतातील ऊस, ठिबक सिंचन व पाइपलाइन यांचे मोठे नुकसान झाले. या आगीमध्ये शेतकरी बाबुराव कोडलिंगे यांचे सुमारे 3 लाखाचे नुकसान झाले आहे.
आत्मदहन करण्याचा इशारा
महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका बसलेल्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा महावितरणच्या कार्यालयासमोर आत्मदहन करू, असा इशारा शेतकऱ्याने दिला आहे.
हेही वाचा- जम्मू काश्मीरच्या शोपीयन प्रांतात चकमक