सोलापूर : मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे जनहित शेतकरी संघटनेकडून वीज बिल माफ करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
शेतकऱ्यांकडून सक्तीने वीजबिल वसुली केली जात आहे. मात्र अनेक कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे एफआरपीचे पैसे अनेक वर्षांपासून बाकी आहे. त्यामुळे या सक्तीच्या वसुलीप्रमाणे शेतकऱ्यांच्या एफआरपीचे पैसेही तातडीने द्यावे अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. याशिवाय शंभर युनिट मोफत वीज देण्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या घोषणेचे काय झाले असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भैया देशमुख, चंद्रकांत निकम, मोरे, किशन जाधव, पांडुरंग गुरव, सुधीर जाधव, सागर सलगर, शरद गुरव, नागनाथ जाधव, बाळू जाधव, महादेव भालेकर, बबन राऊत आदी उपस्थित होते.