सोलापूर - 'आमचं ठरलंय' असे सांगत उत्तर महाराष्ट्रात शिवसैनिकांकडून आदित्य ठाकरे पुढचे मुख्यमंत्री असल्याची पोस्टरबाजी सुरु आहे. त्यातच भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युती अजून फॉर्म्युल्यापर्यंत पोहचली नसल्याचा खुलासा केला आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ते पहिल्यांदाच तुळजापूर आणि पंढरपूरला आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला.
युतीची प्रक्रिया या आठवड्यात सुरु होईल. भाजप शिवसेनेत हिंदुत्वाचा धागा एक आहे. हिंदुत्व म्हणजे मंदिर नव्हे तर जीवन संस्कृती, अशी पुस्तीही पाटील यांनी यावेळी जोडली. त्यामुळे 'पहले मंदिर, फिर सरकार' आणि आदित्य ठाकरे पुढचे मुख्यमंत्री असतील या शिवसेनेच्या कांगाव्याला भाजपने सावधपणे प्रत्युत्तर दिले आहे.
'आमचं नेमकं काय ठरलंय' ते फक्त मुख्यमंत्री, अमित शाह आणि उद्धव ठाकरे या तिघांनाच माहिती आहे. तरीही शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाबाबत बॅनरबाजी सुरु असल्याबाबत विचारल्यावर, तोही कार्यकर्त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न असू शकतो, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला न बोचकरता गुदगुल्या करूनच सावज टिपायचं धोरण ठेवल्याचे स्पष्ट होत आहे.