पंढरपूर - पंढरपूर, मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून दामाजी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष समाधान महादेव अवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आमदार प्रशांत परिचारक यांनी अवताडे यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. याबाबत अधिकृत घोषणा भारतीय जनता पार्टीकडून लवकरच करण्यात येणार आहे.
कोण आहेत समाधान अवताडे?
समाधान आवताडे हे दामाजी सहकारी कारखान्याचे विद्यमान संचालक व चेअरमन आहेत. तसेच ते उद्योजक म्हणून पण ओळखले जातात. समाधान आवताडे यांनी 2014 साली शिवसेनेकडून पंढरपूर, मंगळवेढा निवडणूक लढवली होती. 2019 साली अवताडे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती, यामध्ये त्यांचा निसटता पराभव झाला. ग्रामीण भागामध्ये अवताडे गटाचे प्राबल्य आहे. पोटनिवडणूक जाहीर होण्याच्या आधीच त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. भाजपाकडून समाधान आवताडे यांचे तिकिट जवळपास निश्चित झाले आहे. आता फक्त औपचारीक घोषणा बाकी आहे.
राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी?
दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पंढरपूर मंगळवेढा हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र भाजपकडून समाधान आवताडे यांचे नाव जवळपास निश्चित झाले असतानाही, राष्ट्रवादीकडून अद्याप कोणाच्याही नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मतदार संघ सोडण्यात आला आहे. दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा आहे.
अवताडे 30 मार्चला दाखल करणार फॉर्म
भारतीय जनता पार्टीकडून समाधान अवताडे यांचे नाव पोटनिवडणुकीसाठी निश्चित करण्यात आले आहे. आता केवळ घोषणा बाकी आहे. दरम्यान समाधान अवताडे हे 30 मार्च रोजी आपन फॉर्म दाखल करणार आहेत. यावेळी आमदार प्रशांत परिचारक हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - बाधितांची संख्या कमी न झाल्यास, लॉकडाऊन अटळ - पालकमंत्री छगन भुजबळ