सोलापूर - पोलीस भरतीच्या संदर्भात १८ जानेवारी २०१९ ला शासनाने काढलेले परिपत्रक म्हणजे 'अगोदर मूल आणि नंतर लग्न' असल्यासारखे आहे, अशी टीका माजी पोलीस अधिकारी आणि बार्शीतील शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी केली. सरकारने काढलेल्या पोलीस भरतीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही आंदळकर यांनी स्पष्ट केले.
शासनाने पोलीस भरतीसाठी नवीन निर्णय पारित केला आहे. यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी अगोदर लेखी परीक्षा आणि नंतर शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. यामुळे पोलीस भरती प्रक्रियेमध्ये अभूतपूर्व गोंधळ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पोलीस भरतीसाठी शारीरिक क्षमता ही महत्त्वाची गोष्ट असल्यामुळे अगोदर शारीरिक क्षमता तपासावी आणि त्यानंतरच उमेदवारांची लेखी परीक्षा घ्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
राज्य सरकारला शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या पोलीस शिपायांची भरती करायची आहे की, फक्त कारकुनी काम करणाऱ्या पोलिसांची भरती करायची आहे? असा सवाल आंधळकर यांनी उपस्थित केला. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आंधळकर हे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. याच प्रकरणावरून त्यांनी बार्शी आणि पुणे येथे मोर्चाही काढला आहे.
अगोदरच्या नियमानुसार १०० गुणांची शारीरिक चाचणी झाल्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येत होती. तसेच शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा या दोन्हींचे गुण एकत्र करून पोलीस शिपाईची निवड केली जात होती. त्यामुळे शारीरिक दृष्ट्या सक्षम असलेलेच उमेदवार निवडले जात होते. मात्र, पोलीस शिपाई सेवा प्रवेश २०१९ नुसार पहिल्या टप्प्यात १०० गुणांची आणि त्यानंतर ५० गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. पूर्वी हिच शारीरिक चाचणी शंभर गुणांची असायची ती कमी करण्यात आली आहे. यामुळे भरतीमधून सक्षम पोलीस शिपाई मिळणार नाहीत. तसेच राज्यातील ग्रामीण भागातील अनेक तरुणांवर अन्याय होणार आहे, असा आरोप आंधळकर यांनी करत या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.
बारावीची परीक्षा झाल्यानंतर अनेक विद्यार्थी हे पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करतात. ही सर्व मुले शारीरिक चाचणी सोबतच लेखी चाचणीचा ही अभ्यास करत असतात. मात्र, राज्य शासनाने पोलीस भरती प्रक्रियेत बदल केल्यामुळे अगोदर लेखी परीक्षा आणि नंतर शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. तसेच पूर्वीचा उपलब्ध असलेल्या जागेसाठी एका जागेसाठी पंधरा जण हा नियम रद्द करून नव्याने एका जागेसाठी ५ जण हा नवीन नियम मुलाखतीसाठी लागू केलेला आहे. या नियमामुळे अनेक मुलांचे पोलीस बनण्याचे स्वप्न भंगणार आहे.