सोलापूर - जिल्ह्यातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे अनुदान एकत्र मिळणार आहे. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल, मे आणि जुनचे अनुदान एकाचवेळी देण्याचा केंद्र आणि राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. लाभार्थ्यांना हे अनुदान लवकरच वाटप करण्यात येईल, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
हेही वाचा... पन्नाशीवरील कर्मचाऱ्यांना 'फील्ड ड्युटी' नाही, पुणे पोलिसांचा निर्णय
सोलापूर जिल्ह्यातील इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना. दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या केंद्र पुरस्कृत योजना आहेत. तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या राज्य पुरस्कृत आहेत. या पाच योजनेचे जिल्ह्यात एकूण एक लाख 43 हजार 324 लाभार्थ्यांना लाभ मिळेल. हे अनुदान आठवडाभरात बँक खात्यावर देण्याचे जिल्हा प्रशासनाने नियोजन केले असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मलिंद शंभरकर यांनी दिली.
केंद्र पुरस्कृत वृध्दापकाळ योजना, विधवा निवृत्तीवेतन योजना आणि दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्याना नियमित अनुदानासोबतच एप्रिल आणि मे महिन्यांसाठी प्रत्येकी पाचशे रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. अनुदान वाटपासाठी एकूण 49.51 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सदरचे अनुदार जिल्ह्यातील अकरा तालुके आणि सोलापूर शहर यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणात वर्ग करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. लाभार्थ्यांच्या खात्यावर आठवडाभरात अनुदान वर्ग होईल, असे शंभरकर यांनी सांगितले. सदरची अनुदानाची रक्कम खात्यावरुन परत जाणार नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी खात्यामधून रक्कम सोयीनुसार काढावी. पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी करु नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.