पंढरपूर (सोलापूर) - महाराष्ट्रामध्ये शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याआधी केंद्र सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर विचार करावा व लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमूख मागणीसाठी माळशिरस बहुजन समाजाकडून अकलूज ते माळशिरस पदयात्रा काढत माळशिरस तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले होते. या पदयात्रेत सर्व जाती-धर्माच्या समाजबांधवांनी तसेच माळशिरस तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी मराठा बांधवांच्या आरक्षणाच्या लढ्यात सामील झाले होते. मराठा समन्वक धनाजी सकळकर यांच्या नेतृत्वखाली या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
सकल मराठा समाज, योद्धा प्रतिष्ठान व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने अकलूज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बहुजन समाजाकडून पदयात्रेला सुरुवात झाली. अकलूज येथील सर्व महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन करून अकलूज, संग्रामनगर, पाटील वस्ती, वटपळी मार्गे माळशिरस अशी पदयात्रा काढून माळशिरसच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक वेळेस खेळवले जात आहे आणि आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. मराठा समाजातील उच्चशिक्षित मुले आरक्षणाचा प्रश्न सुटला नसल्यामुळे बेरोजगार आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आजपर्यंत कित्येक बळी गेले आहेत. त्यात आता बहुजन समाजाकडून आरक्षणासाठी मराठा समाजाला पाठीबा दिला आहे.