सोलापूर - अक्कलकोटचा पाणीप्रश्न कायम स्वरूपी सोडवावा, या मागणीला घेऊन आज स्वाभिमानी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने अक्कलकोट तहसीलसमोर आसूड आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी उजनी ते फताटेवाडी या मंजूर एनटीपीसी औद्योगीक पाईपलाईनला जोडा अथवा २५ वर्षांपासून रखडलेली एकरुख सिंचन योजना आगामी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. शेतकरी नेते स्वामीनाथ हरवाळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
केवळ निवडणुका जवळ आल्या की उजनीचे पाणी आणू, एकरुख योजना पूर्ण करू, अशा घोषणा करण्यात येतात. या फेक घोषणेची यंदाची ही पाचवी विधानसभा आहे. पंचवीस वर्षानंतरही एकरुख योजना अद्याप अपूर्णचं राहिलेली आहे. केवळ पंप हाऊसचे बारा कोटींचे काम राहिले आहे. अक्कलकोट शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार-चार योजना असताना त्या अल्पकालीन ठरल्याने शहराला कायम भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. विस ते पंचवीस दिवसांनी एकदा अस्वच्छ पाणी पुरवठा होतो. पाच विधानसभा निवडणुकीनंतरही एकरूख योजना अर्धवट आहे. निवडणुकीपूर्वी ते काम पूर्ण करावे अथवा एनटीपीसी मंजूर पाईपलाईन योजना तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राजकीय इच्छाशक्ती केवळ टँकरपुरती मर्यादित असल्याने शहराचा पाणी प्रश्न तीस वर्षांपासून जैसे थे आहे. या बाबत सरकारने गांभीर्याने विचार न केल्यास येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा आंदोलकांचे नेते स्वामीनाथ हरवाळकर यांनी दिला आहे.