पंढरपूर - भाजपचे माजी युवा मोर्चाचे अध्यक्ष विदूर अधटराव यांच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधटराव यांच्याविरुद्ध तक्रार देणाऱ्या अशोक नवले यांनी आज विष पिऊन करून आत्महत्या केल्याची घटना पंढरपूर येथे घडली. याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूर शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पंढरपूर येथे राहणाऱ्या अशोक नवले यांनी खासगी सावकार म्हणून विदूर अधटराव यांच्याशी पैशाचे व्यवहार केले होते. मात्र, 5 मार्च रोजी अशोक नवले यांनी अधटराव याच्यांविरोधात सावकारकीची तक्रार पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिली होती. त्या तक्रारीवर पंढरपूर पोलीस व सहायक निबंधक यांनी अधटराव यांच्या घरी छापा टाकून घराच्या झडतीमध्ये एकूण 48 चेक, 9 हिशेब वह्या, कोरा स्टॅम्प, चेकबुके, बॅक पासबुकसह रोख रक्कम 29 हजार 340 रुपये जप्त करण्यात आले होते. याच्यावर सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अशोक नवले यांच्या पत्नीचा आरोप..
अशोक नवले यांनी विदूर अधटराव याच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर दोन दिवसांनी अधटराव यांच्या काही कार्यकर्त्यांनी अशोक नवले यांना दमदाटी केली होती. त्यानंतर अशोक नवले दोन दिवस तणावाखाली होते. त्यामुळेच अशोक नवले यांनी आत्महत्या केल्याचा आरोप अशोक नवले यांच्या पत्नी यांनी केला आहे. यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. सदर प्रकरणाचा तपास पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी करत आहेत.