सोलापूर : वयाच्या 86 व्या वर्षीही रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपल्या आयुष्यात रियाजाला विशेष महत्व असल्याचं म्हंटलंय. एखाद्या दिवशी मी जेवण घेणार नाही पण रियाज करते अशा शब्दांत त्यांनी आपल्या गायन कलेवरची निष्ठा व्यक्त केलीय.
अक्कलकोटच्या स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्यावतीने आशा भोसले यांना यंदा प्रथमच स्वामीरत्न हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलाय. तो स्वीकारण्यासाठी त्या अक्कलकोटमध्ये आल्या होत्या. या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. तत्पूर्वी ज्येष्ठ कवी-गीतकार ना.धो. महानोर आणि स्वप्नील जोशी यांना राज्यस्तरीय स्वामी भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसंच यावेळी सोलापूर जिल्ह्यात सामाजिक कार्य करणाऱ्या गणेश चिवटे, गणेश करे-पाटील, अनु व प्रसाद मोहिते, हिंदुराव गोरे आणि पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम यांचा स्वामी सेवक पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पंडित हृदयनाथ मंगेशकर, सीआयडीचे अप्पर महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी,अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजय भोसले, कार्यकारी विश्वस्त अमोल भोसले, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आणि महेश इंगळे हे उपस्थित होते.
या गुणगौरव पुरस्कार सोहळ्याप्रति कृतज्ञता व्यक्त करताना कवी ना.धो.महानोर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनोगत व्यक्त केलं. तर स्वप्नील जोशीनं हा पुरस्कार आपल्यासाठी स्वामींचा प्रसाद आहे अशी भावना व्यक्त केली.