सोलापूर - कोरोना विषाणूच्या संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र संचारबंदी असल्याने शहरात अत्यावश्याक सेवा सोडून सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे शहरात आलेल्या लोकांची जेवणाची सोय होत नाही. त्यामुळे करमाळा शहरातील रूग्णातील रूग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय 'श्रीराम प्रतिष्ठान'च्या वतीने करण्यात आली आहे.
या उपक्रमाअंतर्गत आज (शनिवारी) पुंडे रूग्णालय आणि सारंगकर रूग्णालयातील दाखल रुग्णांना भोजन वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील बाळंतपणासाठी रूग्णालयात दाखल झालेले रूग्ण तसेच इतर आजारांच्या उपचारासाठी शहरात आलेल्या रुग्णांची होणारी गैरसोय पाहता प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चिवटे, यांनी सर्व खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टर तसेच रुग्णांचे नातेवाईक यांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
या उपक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानचे सदस्य दीपक पाटणे यांच्या हस्ते करण्यात आली. हा उपक्रम सुरू केल्याने सर्व ग्रामीण भागातील रुग्ण व नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे. तर लॉकडाऊनच्या काळात अडचणीत असलेल्या गरजूंनी भोजन व्यवस्थेचा लाभ घेण्यासाठी या 7397812428 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन चिवटे यांनी केले आहे.