सोलापूर - सोलापूर शहरात महानगरपालिका प्रशासनाने निर्बंध आणखी कडक केले आहेत. राज्य शासनाने 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू केला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर शहर प्रशासनाने शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी निर्बंध आणखी कडक केले. शनिवारी आणि रविवारी या दोन दिवशी वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा किंवा जीवनावश्यक वस्तूंची दुकाने देखील या दोन दिवशी बंद राहतील. जो कोणी या आदेशाचे उल्लंघन करेल त्याच्यावर सक्त कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिका उपायुक्त जमीर लेंग्रेकर यांनी काल दिली.
हेही वाचा - सोलापूर ग्रामीण कोरोनाचा 'हॉटस्पॉट': दिवसभरात 2 हजार 147 रुग्णांची नोंद
लॉकडाऊनमध्ये विकेंडला कडकडीत बंद
सोलापूर शहरात 5 एप्रिलपासून हळूहळू निर्बंध लावण्यात आले. राज्य शासनाने देखील राज्यभरात लॉकडाऊन घोषित केले. सोलापूर शहरात वाढती रुग्णसंख्या पाहता पालिका प्रशासनाने आणखीन कडक निर्बंध शहरवासीयांवर लादले आहेत. आता या कडक लॉकडाऊनमध्ये विकेंडला फक्त वैद्यकीय सेवांना मुभा देत सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या व्यवहारावर बंदी आणण्यात आली आहे. याची अंमलबजावणी 2 मे (शनिवार) पासून होणार आहे आणि 15 मे पर्यंत विकेंडला सर्व काही कडकडीत बंद केले जाणार आहे.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्णय
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. सोलापुरात काल 2 हजार 486 रुग्ण आढळले, तर 42 रुग्ण उपचार घेत असताना दगावले आहेत.
शहरातील रुग्णसंख्या दोन दिवसांनी पुन्हा वाढली. काल शहरात एकूण 339 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये 195 पुरुष, तर 144 स्त्रियांना कोरोना संसर्गजन्य विषाणूची लागण झाली आहे. सोलापूर शहरात काल दिवसभरात विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या 17 रुग्णांनी उपचारादरम्यान दम तोडला. यामध्ये 10 पुरुष व 7 स्त्रिया आहेत. सोलापूर शहरातील विविध रुग्णालयांत 2 हजार 955 रुग्ण उपचार घेत आहेत. तर, आजतागायत 1 हजार 118 रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे.
जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली गर्दी
सोलापुरात दररोज सकाळी 7 ते 11 पर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांना मुभा देण्यात आली आहे, मात्र खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. त्याचा दुष्परिणामही पाहावयास मिळत आहे. कारण शहराची रुग्णसंख्या वाढतच चालली आहे आणि मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. ही वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी आणि वाढते मृत्यू दर कमी करण्यासाठी विकेंडला कडकडीत बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.
हेही वाचा - 71 लाखांची बोली लागलेल्या सर्जा मेंढ्याचा मृत्यू, वर्षाकाठी द्यायचा 50 लाखांचे उत्पन्न