माढा (सोलापूर)- कोरोना विषाणूचा संसर्ग सोलापूर जिल्ह्यात वाढत असतानाच दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात नागरिकांना पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत.
माढा तालुक्यातील अंजनगाव(खे) गावात पाणी टंचाईची अधिक तीव्रता जाणवत आहे. ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय.
अंजनगाव(खे) गावातील चंद्रकात वासुगडे या शेतकऱ्याने गावाची व्यथा जाणून घेत आपल्या शेतातील बोअरवेल मधील पाणी पाईपलाईन द्वारे ग्रामपंचायतीच्या हौदात दररोज पाणीपुरवठा करत आहेत. मात्र, पाण्याची गरज भागवण्यासाठी प्रशासनाने टॅकर सुरू करण्याची तत्परता दाखवणे आवश्यक आहे. भल्या पहाटे गावातील ग्रामपंचायतीच्या टाकी समोर घागरी नंबर लावून ठेवल्या जातात. मात्र, त्याही सर्वांना मोजक्याच घागरी दिल्या जातात. यामुळे पाणी द्या, पाणी द्या अशी आर्त हाक अजंनगाव(खे) गावचे ग्रामस्थ देत आहेत. नागरिकांसमोर कोरोना विषाणू पेक्षा पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर आहे.
बालगोपाळांपासून ते अबाल वृध्दापर्यत सर्वांनाच पाणी मिळण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे. पहाटे पाच वाजल्यापासूनच हौद व पाण्याच्या टाकी समोर घागरी पाणी मिळावे नंबरला लावल्या जातात. बोअरवेलची मधील पाणी संपल्यानंतर पाण्यावरुन वादावादीचे प्रसंग घडतात.अनेक जणांना रिकाम्या घागरी घेऊन निराशा पदरी घेऊनच जावे लागते.
गावात जलस्वराज्य योजनेतून सीना नदीवरुन पाणीपुरवठा योजना कोट्यवधी रुपये खर्चून आणली आहे. मात्र, ही योजना कुचकामी ठरत असून ती शाश्वत योजना नाही. त्यामुळे ही योजना टंचाईच्या काळात शोभेची बाहुली ठरली आहे.सध्या दोन ठिकाणी ग्रामपंचायतच्या बोअर आहेत. बोअर मधून हौदात पाणी सोडले जाते आणि मोजके पाणी सर्वांना मिळते. ६ हजार लोकसंख्या असलेल्या या गावावरचे पाणीटंचाईचे सावट दूर करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तत्परता दाखवावी, अशी भावना ग्रामस्थांची आहे.