सोलापूर - सोलापूर पुणे महामार्गावर थरारक घटना घडली आहे. टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या पोलिसांना जिवे ठार मारण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला आहे. याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात सहा संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला.
हेही वाचा - समाधान अवताडे यांनी घेतली आमदारकीची शपथ
दरोड्यातील संशयित आरोपी अमोल दत्तू सावंत याला तपास कामासाठी टेंभुर्णी पोलीस घेऊन येताना त्याच्या कुटुंबीयांनी सोलापूर - पुणे महामार्गावर जीवघेणा हल्ला केला. पोलिसांच्या खासगी वाहनाला आरोपीच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या एका खासगी वाहनाने धडक देऊन अमोल सावंत याला पोलिसांच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील कर्मचारी योगेश चितळे यांनी तक्रार दिली आहे.
दरोड्यातील आरोपी अमोल सावंत याला इंदापूरहून पकडले होते
अमोल सावंत विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच, तो अनेक दिवसांपासून पोलिसांना तपासासाठी हवा होता. टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या खबऱ्याने माहिती दिली की, अमोल सावंत हा इंदापूर तालुक्यात कुटुंबीयांसोबत राहत आहे, त्यामुळे पोलीस स्विफ्ट डिझायर हे खासगी वाहन घेऊन त्याला ताब्यात घेण्यासाठी इंदापूरकडे 10 मे रोजी गेले होते. पोलिसांनी सावंतला त्याच्या घरी जाऊन पकडले, त्यावेळी त्याची पत्नी सोनाली सावंत ही घरी होती. त्याने पोलीस घेऊन जात असताना पत्नीला सांगितले की वडिलांना फोन लाव आणि मला यांच्या तावडीतून सोडव.
सोलापूर पूणे महामार्गावर थरार
टेंभुर्णी पोलीस अमोल सावंतला घेऊन स्विफ्ट डिझायर (एमएच 13 इ. 0010) या वाहनातून घेऊन येताना तो सोडवा, वाचवा अशा हाका देत होता. त्यावेळी मागून महिंद्रा कंपनीची एक्सयूव्ही (एमएच 42 एएच 2515) हे वाहन आले आणि या वाहनाने पोलिसांच्या खासगी वाहनाला मागून जोराची धडक दिली. त्यामध्ये दत्तू नारायण सावंत, रोहन दत्तू सावंत, उर्मिला दत्तू सावंत, शर्मिला सावंत, सुरेखा दत्तू सावंत (सर्व रा. सुगाव ता. इंदापूर जि. पुणे) हे बसले होते. आणि त्यांनी पोलिसांच्या वाहनाला धडक मारून आत मधील पोलिसांना मारहाण करून अमोल सावंत याला सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पोलीस अधिकारी सपोनि भोसले यांच्यासोबत वाद घालून त्यांचा गणवेश फाडला, तसेच इतर पोलिसांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.
आणखीन पोलीस कर्मचारी आल्याने अनर्थ टळला
दरोड्यातील आरोपी अमोल सावंत याला पोलीस तावडीतून सोडवण्यासाठी महामार्गावर झटापट होत आहे आणि पोलिसांवर हल्ला झाला आहे, याबाबत माहिती मिळाल्यावर इंदापूर येथील इतर पोलीस कर्मचारी दाखल झाले आणि मोठा अनर्थ टळला. या मधील सर्व आरोपींना ताब्यात घेत त्यांना इंदापूर पोलीस ठाण्यात आणून भा.द.वि. च्या कलम 307, 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास इंदापूर (पुणे) पोलीस करत आहे. पुणे जिल्ह्याच्या हद्दीत सोलापूर पोलिसांवर जीवघेणा हल्ला झाल्यामुळे पोलीस प्रशासन हादरले आहे.
हेही वाचा - सोलापूर शहरात लॉकडाऊनमध्ये दोन दिवसांची शिथिलता