सोलापूर - भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सांगता झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी व काँग्रेसच्या एकाने अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. राणा जगजितसिंह व धनंजय महाडिक तसेच काँग्रेसचे जयकुमार गोरे यांनी भाजप प्रवेश केला. त्यामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, भाजपमध्ये विरोधकांचे सर्वच नेते येत आहेत. असेच राहिले तर शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांशिवाय विरोधात कुणीच शिल्लक राहणार नसल्याचे म्हणत विरोधकांच्या महागळतीवर टीका केली. शरद पवार यांनी मागील 15 पंधरा वर्षाचा लेखाजोखा द्यावा. युपीए सरकारने भष्ट्राचाराशिवाय काहीच नाही केले नसून तब्बल 12 लाख करोड रुपयाचा घोटाळा केला आहे. त्यामुळे मागील सरकारमधील घोटाळ्यांनी मोठा खड्डा पडला आहे. तो भरुन काढण्यासाठी फडणवीसांना पुन्हा एकदा संधी द्या. केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात फडणवीस सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रात विकास घडवून आणू, असे शाह म्हणाले. तसेच 370 कलम रद्द केल्याने भारत अखंड झाला आहे. कलम 370 हटवल्यानंतर एकही गोळी काश्मीरात चालली नाही. मात्र राहुल गांधी आणि शरद पवार याच्या विरोधात आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यांचा फायदा पाकिस्तान घेत असल्याचा आरोप शाहांनी केला.
मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत म्हणाले की वसंतराव नाईक यांच्या नंतर फडणवीसांनी 5 वर्षे पूर्ण सरकार चालवले आहे. तसेच जलयुक्त शिवार योजनेचेही कौतुक करत तब्बल 22 हजार गावे पाणीदार झाल्याचे म्हणाले. फडणवीसांनी समाजातील सर्वच घटकांचा विकास साधला आहे. त्यांना पुन्हा एकदा संधी द्या, राहिलेला विकास नक्कीच करु असेही शाह म्हणाले. त्यामुळे पुढील सरकारमध्ये भाजपकडून मुख्यमंत्री बनण्यास फडणवीसांना त्यांनी एकप्रकारची मान्यताच दिली आहे. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनीही विरोधकांवर जोरदार टिकास्र सोडले. ईव्हीएम वरुन विरोधकांना म्हणाले की, बारामतीची जागा सुप्रिया सुळे निवडून येतात. तेव्हा ईव्हीएम चांगले आणि सोलापूरचे जयसिध्देश्वर महाराज निवडून आले तर ईव्हीएमवर दोष देतात. त्यामुळे विरोधकांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. आघाडी म्हणजे नापास विद्यार्थ्यांचा वर्ग आहे. ते नेहमी नापास होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
शाहांची युतीबाबत चुप्पी -
अमित शाहांनी भाजप-सेनेच्या युतीबाबत शब्दही काढला नाही. शिवाय फडणवीसांनाच पुढील मुख्यमंत्री बनवा, अशी मागणी त्यांनी जनतेकडे केली. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, सेनेबाबत त्यांनी चुप्पी साधली.