सोलापूर - पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी जवळपास 36 तासांचा अवधी लागणार आहे. वारकऱ्यांची दर्शनरांग ही गोपाळपुरच्या पुढे दीड किलोमीटरपर्यंत गेली असून पत्राशेडसह 30 हजार वारकरी सध्या दर्शन रांगेत थांबले आहेत.
राज्यभरातून आलेल्या सर्व संतांच्या पालख्या आता पंढरीत दाखल झाल्या आहेत. जवळपास दहा लाख भाविक पंढरपुरात आले असून वारकऱ्यांनी पंढरपूर फुलून गेले आहे. आता हे वारकरी चंद्रभागेत स्नानासाठी जात असून त्यानंतर दर्शन रांगेत येऊन उभे राहणार आहेत. ही रांग वाढतच जात आहे.
सायंकाळपासून वारकऱ्यांची गर्दी गोपाळपूरकडे रवाना होत आहे. ही गर्दी वाढत जाणार असल्याने दर्शनासाठी लागणार वेळही वाढत जाणार आहे. पण वेळ कितीही लागला तरी सावळ्या विठुरायाचे दर्शन घेतल्याशिवाय माघारी जायचे नसल्याचे वारकऱयांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.