सोलापूर - महानगरपालिकेच्या वतीने कोविड-19 विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना व नियमावली जाहीर करण्यात आल्या आहेत. या नियमावलीचे पालन करणे शासकीय व खासगी डॉक्टरांना बंधनकारक आहे. सारी(SARI) किंवा कोरोना सदृश रुग्ण आढळल्यास शासनाच्या आरोग्य केंद्रास कळविणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.
बुधवारी महापालिका आयुक्त शिवशंकर, उपायुक्त अजयसिंग पवार, व वैद्यकीय अधिकारी यांनी सोलापूर शहरामधील खासगी क्लिनिकची तपासणी करून तीन खासगी डॉक्टरांना नोटीस बजावली आहे. तर एका खासगी डॉक्टरावर आपत्ती निवारण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. डॉ. मोनाली देशमुख (अवंती नगर) डॉ.नफिसा शेख (नीलम नगर) डॉ. अमोल देशमुख (अवंती नगर) यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर कलावती नगर येथील डॉ. शशिकांत चंद्रकांत खूजरगी(बनशंकरी क्लिनिक) यावर आपत्ती व्यवस्थापनांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सोलापूर महापालिका रुग्णालय, शहरी नागरिक आरोग्य केंद्र, फिव्हर ओपीडी सर्व नोंदणीकृत खाजगी रुग्णालये व शासकीय रुग्णालये, डिस्पेंसरी, ओपीडी, वैद्यकीय व्यावसायिक यांना ताप सदृश्य अथवा आय.एल.आय(इली) रुग्ण आढळल्यास त्याला औषध उपचारांसह महापालिकेचे बॉईज प्रसूतिगृह, दाराशा प्रसूतिगृह, मंजरेवाडी शहरी नागरिक आरोग्य केंद्र व मुद्रा सनसिटी या चार ठिकाणी त्यांना स्वॅब घेण्यासाठी पाठवण्यात यावे, असा आदेश यापूर्वी जाहीर झाला आहे.
स्वॅब घेतल्यानंतर आरोग्य अधिकारी सोलापूर महानगरपालिका यांच्याकडे ईमेल आयडी व त्यांचा अहवाल पाठविण्याचे तसेच प्रपत्र 1 व प्रपत्र 2 नुसार माहिती अद्ययावत ठेवण्याचे निर्देश ३१ जुलैला देण्यात आले होते.
परंतु, सोलापूर शहरातील काही क्लिनिक मधील डॉक्टरांनी तसे केले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बुधवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कलावती नगर मधील बनशंकरी क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी केली. येथील डॉक्टरांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. मानवी जीविताची सुरक्षा धोक्यात येण्यासारखे कृत्य केल्यामुळे डॉ. शशिकांत चंद्रकांत खूजरगी यांच्या विरुद्ध कलम 188 सह आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.