सोलापूर: सोलापूर शहर आणि जिल्ह्यातुन काँग्रेसच्यावतीने कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेत सहभाग घेतला होता. कार्यकर्त्यांना घेऊन जाण्यासाठी काँग्रेसकडून स्वतंत्र वाहने करण्यात आली होती. भारत जोडो यात्रेत जाताना बाळापूर येथे सोलापुरातुन निघालेल्या लक्झरी बसचा अपघात झाला होता. यामध्ये सात जण जबर जखमी (several injured) झाले होते. यांना उपचारासाठी सोलापूरकडे परत पाठविण्यात आले होते. पण अपघातातील या जखमींची ससेहोलपट होत असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातातील जखमींची ससेहोलपट याबाबत जखमी अंबादास जाधव यांनी माहिती दिली. अपघातात जखमी होऊन परत आलो, पण एकही काँग्रेस नेताआम्हाला पाहायला देखील आला नाही. काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती यांच्या घरी जाऊन आलो. त्याठिकाणी देखील उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सध्या सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. पण उपचारासाठी धावपळ होत असल्याने हातातील रोजगार निसटला आहे. असेही अंबादास जाधव यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले.
जखमींना काँग्रेस नेत्यांनीच दाखवली पाठ- 17 नोव्हेंबर 2022 रोजी भारत जोडो यात्रेला जाताना बाळापूर येथे महामार्गावर डीवायडरला धडकून लक्जरी वाहन पलटी झाले होते. यामध्ये जवळपास पाच ते सहा महिला व दोन पुरुष जखमी झाले होते. जखमींना आश्वासन देण्यात आले होते की, सोलापूरला परत जा, तेथे उपचार करा. आम्ही खर्च देऊ पण कोणीही काँग्रेस नेता,आम्हाला बघायला किंवा विचारपूससाठी देखील आला नाही. या महिलांनी व पुरुषांनी स्वखर्चाने उपचार घेतले आहेत.काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी आमच्याकडे पाठ दाखवली आहे अशी केविलवाणी खंत जखमी अंबादास पिरप्पा जाधव वय 47 ,रा-सोलापूर यांनी व्यक्त केली आहे.