सोलापूर : सोलापूर येथील जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या महिला वकिलाने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे. अॅड. स्मिता धनंजय पवार (वय-३१) असे या महिला वकिलाचे नाव आहे.
अॅड. स्मिता पवार यांनी बुधवारी दुपारी २.५० च्या सुमरास अज्ञात कारणावरून सोलापूर येथील राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. मंगळवेढा येथील विठ्ठल गोवे यांची कन्या अॅड. स्मिता हिचा विवाह सोलापूर येथील धनंजय पवार याच्यासोबत ६ मे २०१८ रोजी झाला होता. तेव्हा पासून त्या सोलापूर येथील न्यायालयात प्रॅक्टीस करत होत्या. दरम्यान, त्या बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास सोलापुरातील जुनी पोलीस लाईन मुरारजी पेठ येथील राहत्या घरी पहिल्या मजल्याच्या बेडरूममध्ये नारंगी रंगाच्या साडीने छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
त्यांना सिव्हील रुग्णालय सोलापूर येथे दाखल करण्यात आले. यावेळी, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही वार्ता डॉ.अनिकेत मानेकर यांनी पोलिसात दिली असून अधिक तपास हवालदार काझी हे करत आहेत.