सोलापूर - कोरोना महामारीमुळे शाळांतील किलबिलाट बंद झाला आहे. सध्या ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात येत आहे. अनेक शाळांनी स्मार्ट फोन, लॅपटॉपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. मात्र, ग्रामीण भागात सुविधांअभावी ऑनलाईन शिक्षण कसे द्यायचे? असा प्रश्न अनेक शिक्षकांना पडला आहे. यावर उपाय म्हणून बादोले बुद्रुक गावातील के. पी. गायकवाड शाळेतील मयूर नारायण दंतकाळे या कला शिक्षकाने भन्नाट शक्कल लढवली आहे. स्मार्टफोन ऐवजी 'स्मार्ट मंदिर' ही अनोखी संकल्पना त्यांनी मांडत गावातील मंदिर, मशिद आणि समाज मंदिरांच्या लाऊडस्पीकरवरून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बादोले बुद्रुक या गावाची लोकसंख्या जेमतेम 5 हजारांच्या जवळपास आहे. गावातील 30 टक्के लोकांकडे मोबाईल फोन नाहीत. त्यामुळे त्यांच्या पाल्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे कठीण जात होते. कलाशिक्षक मयूर दंतकाळे यांनी स्मार्टफोन ऐवजी 'स्मार्ट मंदिर' ही संकल्पना मांडली आणि गावातील पालकांनीही त्यांना पाठिंबा दिला. इयत्ता पाचवी ते आठवीचा अभ्यासक्रम लाऊडस्पीकरवरून शिकवला जात आहे. गावातील 240 विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ होत आहे.
अभ्यासक्रमाचे रेकॉर्डिंग करून ते एमपीथ्रीमध्ये कन्व्हर्ट करून पेन ड्राईव्हच्या सहाय्याने गावातील लाऊडस्पीकरवर वाजवले जाते. दररोज सकाळी 7 ते 9 या प्रसन्न वातावरणात संगीताच्या तालात विद्यार्थी धडे गिरवत आहेत. या उपक्रमाला विद्यार्थी व पालक वर्गाचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमासाठी के. पी. गायकवाड हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील गुमास्ते, अध्यक्ष मल्लिनाथ बगले, महादेव सोनकर, कैलास गायकवाड, माधव बगले,नागनाथ धर्मसाले यांचे सहकार्य मिळाले.