सोलापूर- आज दुपारी एका मेंढपाळाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. त्याच्या सकट तीन शेळ्यांचा देखील या घटनेत मृत्यू झाला आहे. ही घटना आज सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास मुख्य व्हीआयपी रस्त्यावर गांधी नगर जवळ घडली. मुजाहिद हनिफ शेख (वय २२, रा दक्षिण सदर बझार, सोलापूर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मुजाहिद शेख हा युवक दुपारी आपल्या शेळ्या घेऊन घराकडे जात होता. अचानक जोरदार पावसामुळे त्याचा गोंधळ उडाला. त्याने गांधी नगर जवळील सुरभी हॉटेल शेजारी असलेल्या एका झाडाचा आसरा घेतला. परंतु, त्याची एक शेळी ही जाग्यावर न थांबता बाजूला असलेल्या विद्युत खांबाजवळ गेली. या खांबात विद्युत प्रवाह संचारला होता. या खांबाला चिकटून शेळीचा मृत्यू झाला. शेळीला वाचवण्यासाठी मुजाहिद गेला असता त्याला देखील विजेचा जोरदार झटका बसला आणि तोही विद्युत खांबाला चिटकला. त्यासोबत असलेल्या दोन शेळ्यांनाही विद्युत झटका बसला.
परिसरातील हॉटेल चालकाला ही माहिती कळताच त्यांने महावितरणच्या अधिकाऱ्यांना व पोलिसांना ही माहिती दिली. मुख्य व्हीआयपी रस्त्यावर ही घटना घडल्याने मोठी गर्दी झाली होती. महावितरणचे अधिकारी व सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या मार्गावरील विद्युत प्रवाह बंद केला आणि मुजाहिदला विद्युत खांबापासून बाजूला काढून त्याच्या छातीवर हातानी दाब देत कृत्रिमरित्या श्वास देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुजाहिदचा मामा बाबूमिया शेख यांनी त्यास सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलवले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. महावितरण मधील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मुजाहिदचा मृत्यू झाल्याचा आरोप करत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे. याबाबत सिव्हील पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा- पंढरपूर तालुक्यात निराधार योजनेतील ३४ प्रकरणे मंजूर