सोलापूर - सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांना उपचार मिळणे अवघड झाले आहे. शिवाय बेड आणि ऑक्सिजन अभावी अनेकांचे बळी जात आहेत. गोरगरिबांची उपचारासाठी अक्षरशः वणवण होत आहे. सोलापुरात रुग्णांची अवस्था बघून प्रभाग क्रमांक १६ च्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका फिरदोस पटेल या प्रभागातील गरजू रुग्णांसाठी धावून आल्या. त्यांनी गुरूनानक चौक परिसरातील ऑफिसर्स क्लबसमोर असलेल्या संस्मरण उद्यानाच्या बाहेरील मोकळ्या जागेत रस्त्याच्या कडेला चक्क कंटेनर कोविड सेंटर उभारले आहे.
हेही वाचा - सोलापुरातील निर्बंध आणखी कडक; दर शनिवारी आणि रविवारी वैद्यकीय सेवा वगळून सर्व बंद
पटेल यांनी उभारलेले कंटेनर साधेसुधे नसून संपूर्ण वातानुकूलित असून या ठिकाणी २४ तांस डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे. आठ बेडचे ऑक्सिजनयुक्त हे कंटेनर कोविड सेंटर सोमवारपासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती नगरसेविका फिरदोस पटेल यांनी दिली.
नगरसेवक फंडातून कोविड कंटेनर उभे केले
नगरसेवक फंडातून सुमारे १५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या कंटेनर कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन बरोबरच औषधगोळ्यासुद्धा मोफत देण्यात येणार आहेत. कोरोनाच्या कालावधीत ऑक्सिजन बेड न मिळाल्याने कोणाचा जीव जाणार नाही, या उद्देशाने हे वातानुकूलित कंटेनर कोविड सेंटर उभारण्यात आल्याचे नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सांगितले.
प्रभागातील नागरिकांसाठी उभे केले कोविड सेंटर
आपण ज्या प्रभागातून निवडून आलो आहोत त्यासाठी हा उपक्रम असल्याची माहिती पटेल यांनी दिली. आपल्या प्रभागात दाटीवाटीने असलेली घरे आणि अन्य कारणांमुळे नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. अन्य मोठ्या रुग्णालयात नागरिकांची हेळसांड होऊ नये म्हणून तातडीने त्या नागरिकाला उपचार मिळावेत म्हणून ऑक्सिजनयुक्त कंटेनर कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली.
लोकप्रतिनिधींनी पूढे येऊन शासनाची मदत करणे गरजेचे
महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी शुक्रवारी दुपारी या वातानुकूलित कंटेनर कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले. नगरसेविका फिरदोस पटेल यांनी राबविलेली ही संकल्पना अत्यंत चांगली आहे. प्रत्येक प्रभागात असे कंटेनर कोविड सेंटर उभारले तर मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी होण्यास निश्चित मदत होईल, असे त्यांनी सांगितले. कोरोनाची महामारी कमी करायची असेल तर सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या प्रभागात असे सेंटर उभारून रुग्णांच्या मदतीला धावून आले पाहिजे, असे ते म्हणाले.
महापालिका आपल्यापरीने कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतच आहे. असे असतानाच लोकप्रतिनिधींनीसुद्धा आता आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून कोरोना रुग्णांसाठी एक पाऊल पुढे टाकल्यामुळे बऱ्याच गोष्टींवरचा ताण कमी होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले.
ऑक्सिजन बेडसह गरम पाण्यासाठी गिझर
नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सुरू केलेल्या दोन वातानुकूलित कंटेनर कोविड सेंटरमध्ये एकूण आठ बेड आहेत. ज्यामध्ये चार बेड ऑक्सिजनयुक्त, तर ४ बेड अन्य रुग्णांवर उपचारासाठी ठेवण्यात आले आहेत. एका कंटेनरमध्ये ओपीडीसह चार बेड, तर दुसऱ्या कंटेनरमध्ये ऑक्सिजन बेड, तसेच रुग्णांवर उपचार करण्यासाठी येणारे एम.डी. मेडिसीन डॉक्टर, तसेच नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी वातानुकूलित रूम तयार करण्यात आली आहे. या शिवाय रुग्णांना संडास आणि बाथरूमची व्यवस्था असून गरम पाण्यासाठी गिझरचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे.
मुबलक पाण्याची व्यवस्थासुद्धा टाक्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. दोन्ही कंटेनरमध्ये २४ तांस चालेल अशी वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच, पंखेसुद्धा बसविण्यात आले आहेत. स्वच्छ प्रकाश यावा म्हणून एलईडी लाइट्स लावण्यात आले आहेत. तर, ऑक्सिजनचे सिलेंडर ठेवण्यासाठी कंटेनरच्या बाहेर सुरक्षित अशा प्रकारचा बॉक्स तयार करण्यात आला आहे. कंटेनर बाहेरील संपूर्ण परिसर स्वच्छ राहण्यासाठी व रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी बाकडे टाकून विविध प्रकारच्या झाडांनी परिसर सुशोभित करण्यात येणार आहे.
हेही वाचा - सोलापूर ग्रामीण कोरोनाचा 'हॉटस्पॉट': दिवसभरात 2 हजार 147 रुग्णांची नोंद