सोलापूर- जोडभावी पेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीत गावठी दारू विक्रेत्याचा सुळसुळाट झाला होता. त्याअनुषंगाने जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने कारवाई करून रबरी ट्यूब मधून गावठी दारूची तस्करी करणाऱ्या संशयीत आरोपी दिनेश अनिल कांबळे(वय 30)रा.मुळेगाव तांडा,दक्षिण सोलापूर यास अटक केली आहे.तसेच 20 हजार रुपयांची हातभट्टी दारू,आणि रिक्षा असा एकूण 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामधील मुख्य आरोपी हातभट्टी दारू तयार करणारा नागेश पवार यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस त्याचा तपास करत आहेत.
पेट्रोलिंग करत असताना रिक्षा पकडली
जोडभावी पेठ पोलीस ठाण्यातील डीबी पथक दहिटने शेळगी मार्गावर पेट्रोलिंग करत होते. एका गुप्त बातमीदाराने माहिती दिली की, याच मार्गावरून गावठी दारूची तस्करी केली जाते. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एक रिक्षा संशयीत रित्या जाताना दिसली. पोलिसांनी ताबडतोब रिक्षा थांबवून त्याची तपासणी केली. त्यामध्ये 5 रबरी ट्युबा आणि त्यात 80 लिटर हातभट्टी दारू आढळली. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता रिक्षा चालक दिनेश कांबळे याने मुळेगाव येथील नागेश पवार याची दारू असल्याची माहिती दिली.
पोलीसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपीवर केला गुन्हा दाखल
डीबी पथकातील पोलिसांनी 80 लिटर गावठी दारू आणि रिक्षा, हा सर्व मुद्देमाल जप्त करून रिक्षा चालकावर गुन्हा दाखल केला. मुख्य संशयीत आरोपी सध्या फरार असून त्यावर गुन्हा दाखल करून पोलीस त्याचा तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम, राजेंद्र करणकोट,पीएसआय दाईगडे,नंदकुमार गायकवाड,योगेश बर्डे,प्रकाश गायकवाड,बापू साठे,अभिजित पवार,सुहास गायकवाड,यश नागटिळक,सैपन सय्यद,गोपाळ शेळके आदींनी केली
हेही वाचा-ठाकरे सरकारला दारूबंदी उठवण्यासाठी वेळ असून आरक्षणाकडे मात्र दुर्लक्ष - बावनकुळे