सोलापूर - जिल्ह्यात कोरोनाचा आकडा सातशेच्या वर गेला आहे. गुरुवारी सकाळच्या अहवालानुसार मागील 24 तासात 85 जणांचा कोरोनाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आलेला आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 709 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे तब्बल 67 जणांचा जीव गेला आहे. तर 311 जण कोरोनामधून बरे होऊन घरी परतले आहेत.
सोलापूर जिल्हा प्रशासनाने आज दिलेल्या आकडेवारीनुसार सोलापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा 709 झाला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
यामध्ये अकलूज, पंढरपूर, सांगोला, अक्कलकोट या तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंत फक्त सोलापूर शहरात असलेला कोरोना आता सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील शिरला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्व दुकाने सुरू करायला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता ग्रामीण भागात कोरोनाचे रूग्ण आढळत आहेत आणि ग्रामीण भागातील व्यवसाय सुरू झाल्यामुळे या पुढील काळात नागरिकांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे.