सोलापूर - तलवार, कुराड व लाकडी दांडके हातात घेऊन फोटो काढणे व ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणे काही तरुणांना महागात पडले आहे. फोटोमधील सात संशयित तरुणांना अकलूज पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा - माढ्यात प्रियकराच्या मदतीने आईने केला पोटच्या मुलाचा खून
पोलिसांकडून मिळेल्या माहितीनुसार, माळशिरस तालुक्यातील पिसेवाडी येथील दीपक शिवाजी भाकरे, शहाजी जनार्धन इंगळे, शैलेश शहाजी भाकरे, महेश नवनाथ भाकरे, सागर अच्युतराव चव्हाण, सतिश सदाशिव इंगळे व समाधान निवृत्ती भाकरे या सात जणांनी हातामध्ये तलवार, कुराड व लाकडी दांडके घेऊन फोटो काढले होते. आणि ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. हे फोटो सोशल मीडियावर आल्याने जनसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोठेतरी टोळीयुद्ध होणार की काय, अशी आशंका निर्माण झाली होती. मात्र, पुढील हालचाली करण्यापूर्वीच अकलूज पोलिसांनी ताबडतोब या सात जणांचा शोध घेत त्यांना अटक केली.
कारवाई करून आर्म्स अॅक्ट प्रमाणे गुन्हे दाखल
या सर्व तरुणांवर आर्म्स अॅक्टच्या कलम ४/२५ व मुंबई पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस अंमलदार बाळासाहेब पानसरे, संतोष घोगरे, सुहास क्षीरसागर, रामचंद्र चौधरी आदींनी केली.
हेही वाचा - परवानगी शिवाय नंदीध्वजाची पूजा, सिद्धेश्वर मंदिरात असंतोष