सोलापूर - उजनी धरणातून वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर आज कारवाई करण्यात आली आहे. वाळू उपसा करणाऱ्या सात बोटी जिलेटीनच्या सहाय्याने उडवून देण्यात आल्या आहेत. या प्रकरणात सात बोट मालक आणि चौदा बिहार येथील कामगारांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही कारवाई करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी केली.
करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली हद्दीत उजनी धरणात वाळू चोरी केली जात होती. धरणातील पाण्यात सात यांत्रिक बोटीच्या सहाय्याने मागील काही दिवसापासून वाळू चोरी होत होती. या वाळू चोरीवर करमाळा पोलिसांनी कारवाई केली असून, पोलीस पथकाने ३४ लाख रुपयांच्या सात यांत्रिक बोटींसह ३ लाख ४० हजार रुपयांची ३४ ब्रास वाळू, असा ३७ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी प्रदीप पर्वते (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. श्रीकांत पाडूळे, पोलीस कर्मचारी प्रदीप पर्वते, सचिन हिंगमिरे यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत करमाळा तालुक्यातील शंकर कवडे (कात्रज),राजू कोकरे (खातगाव) तर इंदापूर तालुक्यातील रवी देवकते,राजू देवकते, अमोल बंडगर, पप्पु ढवळे (सर्व राहणार मदनवाडी),बाबू काळे (भिगवण) तसेच १४ अज्ञात व्यक्ती (बिहार) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला गेला आहे. पोलीस पथक कारवाई करत असताना संशयितांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.