सोलापूर- आंध्र प्रदेश येथील विशाखापट्टणम येथून मुंबईकडे घेऊन जात असलेले सहा किलो तस्करीचे सोने सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले .सोलापूर-पुणे महामार्गावर असलेल्या सावळेश्वर टोल नाक्यावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
चालकाच्या सीट खाली लपवले होते सोने-
दोघे संशयीत आरोपी सोने घेऊन विशाखापट्टणमहून - मुंबईकडे जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर सावळेश्वर टोल नाक्यावर पोलिसांनी सापळा रचत प्रत्येक चारचाकी वाहनांची तापसणी सुरु केली. संशयीत आरोपींची गाडी अडवून विचारपूस केल्यास प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, गाडीची कसून तपासणी केल्यानंतर चालकाच्या सीट खाली एक लॉकर पोलिसांना आढळून आले. ज्यात तस्करीचे सोने लपवण्यात आले होते.
एक किलो प्रमाणे सहा सोन्याची बिस्किटे-
पोलिसांनी लॉकरमधून एक किलो प्रमाणे सहा सोन्याची बिस्किटे बाहेर काढली. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत जवळपास सहा ते सात कोटी रुपयांपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची मध्यरात्री टोल नाक्याला भेट-
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी टोल नाक्यावर सहा किलो सोने जप्त केल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी टोलनाक्यावर हजेरी लावत घटनेबाबत माहिती घेतली. याबाबत चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी पहाटेपर्यंत सुरु होती.