सोलापूर - मंगळवेढा येथील 41 गतिमंद विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव यांच्या मार्फत सर्व 41 विद्यार्थ्यांना शुक्रवारी पहाटेच सोलापूर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. शुक्रवारी पालकमंत्री दत्ता भरणे यांनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांशी चर्चा करून गतिमंद विद्यार्थ्यांची विचारपूस केली. सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत, कोणताही गतिमंद विद्यार्थी गंभीर नाही सर्वांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
मुक्ताई आश्रम शाळेतील गतिमंद विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण -
मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथे मुक्ताई आश्रम शाळा आहे. या ठिकाणी गतिमंद विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण दिले जाते. गुरुवारी अचानक तीन विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. आश्रम शाळेच्या व्यवस्थापन विभागाने ताबडतोब समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तीन विद्यार्थ्यांना ताप भरपूर होता, सिव्हील हॉस्पिटल प्रशासनाने सर्व 41 विद्यार्थ्यांची तपासणी केली असता सर्वांना याची लागण झाली असल्याचा अहवाल आला आहे.
पालकमंत्र्यानी नियोजन भवन येथे बैठक घेऊन सिव्हील हॉस्पिटलचा केला दौरा-
शुक्रवारी दिवसभर पालकमंत्री दत्ता भरणे यांचा सोलापूर दौरा आहे. त्यानिमित्ताने सोलापूर येथील नियोजन भवन येथे बैठक घेतली. मंगळवेढा येथील गतिमंद विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे याचा आढावा घेतला. बैठकीनंतर त्यांनी ताबडतोब आपला मोर्चा सरकारी रुग्णालयाकडे वळविला. पीपीई किट परिधान करून त्यांनी उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला.