सोलापूर - येथील बापू नगरे या मच्छीमाराला केतूर नंबर एक परिसरातील कोकणे मळा येथे १७ किलो वजनाचा 'कटला' जातीचा मासा सापडला आहे. परिसरातील उजनी पाणलोट क्षेत्राच्या फुगवटयाच्या गोड्या पाण्यात एवढा मोठा मासा सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. या माशाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
हेही वाचा- ...आता येथून पुढे 'नो कॉमेंट्स' - अजित पवार
हा मासा भिगवन (ता.इंदापूर) येथील मच्छीमार्केटमध्ये विक्रीसाठी नेण्यात आला होता. त्याला २६० रुपये प्रति किलो भाव मिळाला आहे. एकूण ४ हजार ४४० रुपयांना हा मासा विकला आहे. हा मासा पुणे येथील व्यापाऱ्यांनी खरेदी केला.
उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यामुळे पात्रातील कुठल्यातरी डोहात हा मासा राहिला असेल. त्यामुळे याची भरपूर वाढ झाली असेल. धरण भरल्यानंतर त्याच्या मुक्त विहारात अपघाताने तो मासेमारी करणाऱ्या जाळीत सापडला आहे. जरी सद्या मासे अत्यल्प प्रमाणात सापडत असले तरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे नजीकच्या काळात भरपूर मासे मिळतील असा अंदाज आहे. मात्र, त्यांच्या निकोप वाढीसाठी वरचेवर मोठ्याप्रमाणावर जलाशयाचे प्रदूषित पाणी त्यासाठी मोठा अडसर ठरणार आहे, असे पशुपक्षी अभ्यासक डॉ.अरविंद कुंभार यांनी सांगितले.
यावर्षी उन्हाळ्यात उजनी जलाशयाचा पाणीसाठा वजा ५९ टक्के पातळीवर गेला होता. त्यामुळे जलाशयातील मासे संपुष्टात आले होते. त्यातच सध्या उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेले असूनही मच्छीमारांच्या जाळ्यात मासेच सापडत नाहीत. त्यामुळे मच्छीमार संकटात आले आहेत. यापूर्वी दररोज ४० ते ५० किलो मासे सापडत होते. मात्र, आता केवळ ३ ते ५ किलोच माशांवर मच्छीमारांना समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे पूर्ण भरलेल्या जलाशयात मासेमारी सध्या धोक्यात आली आहे. या सर्वामुळे मच्छीमार शेतमजूर म्हणून कामाला जाणे पसंत करू लागले आहेत.
उजनी जलाशयातील पाणी उन्हाळ्यात संपले होते तेव्हाच मासेही संपले होते. आता वाढलेल्या पाण्यामध्ये विविध जातीच्या माशांचे मत्स्यबीज सोडले तर जलाशयात मासे वाढतील. सध्या अथांग भरलेल्या जलाशयात मासेच नसल्याने मासेमारी करणे अवघड झाले आहे. त्यामुळे मासेमारी सोडून शेतमजुरीची कामे करावी लागत आहेत, असे वीरसिंग नगरे, सिताराम पतुले या मच्छीमारांचे म्हणणे आहे.
सध्या तुडूंब भरलेल्या उजनी जलाशयाच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषीतपणा आल्याने पाण्याला हिरवा रंग येण्याबरोबरच जलाशयाच्या कडेला पाण्यावर पांढरा फेसही येत आहे. हे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. हे प्रदूषित झालेले पाणी जलाशयातील माशाबरोबरच इतर जलचर व पाण वनस्पतींनाही धोकादायक ठरत आहे. मात्र, अत्युच्च पातळीवर वाढलेल्या या पाणी प्रदूषणाकडे कोणाचेही लक्ष नाही.