पंढरपूर - मंगळवेढा तालुक्यातील सहकारी संस्था आणि दूध उत्पादन संस्था मिळून तब्बल १५३ संस्थांना कायमस्वरुपी टाळे ठोकण्याची कारवाई करण्यात आली आहे. सहकार विभागाने तालुक्यातील ८३ सहकारी दूध उत्पादक संस्था अवसायनात काढल्या आहेत. या संस्थांचे पत्ते, ऑनलाइन नोंदणी, लेखा परीक्षण, निवडणूक व अन्य बाबींच्या आधारावर सहकारी संस्थेचे सहायक निबंधक ए.ए. गावडे यांनी या सस्थांची तपासणी केली. तपासणीनंतर या संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेला हा प्रयत्न बऱ्याच अंशी यशस्वी होत असून, आता सहकार खात्यात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही कागदोपत्री संस्था कमी झाल्याने, त्यांचे रेकॉर्ड ठेवण्याचा त्रास कमी होणार आहे. गेल्या काही वर्षांत जिल्हा दूध संघात सुरू झालेल्या अंतर्गत राजकारणामुळे सहकाराची घडी विस्कटली. यापूर्वीच्या सरकारने नुसत्याच कागदोपत्री असलेल्या सहकारी संस्था बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार निष्क्रिय संस्था बंद करण्याची करवाई सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातील ज्या सहकारी संस्था अवसायनात काढल्या आहेत, त्यांना नोटीस बजावल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.