सोलापूर - ग्रामीण भागात जबरी चोरी करून लूट करणाऱ्या दरोडेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये पोलिसांनी विविध तालुक्यातून एकूण 15 संशयित दरोडेखोरांना अटक केली आहे व त्यांच्याकडून मोटारसायकल, मोबाईल हँडसेट, रोख रक्कम असा एकूण 82 हजारांचा मुद्देमालही जप्त केला आहे. ही माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
माळशिरस पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 सप्टेंबर रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास घरात घुसून जबरी चोरी झाली होती. याबाबत रसना बाळू काळे (वय 21 रा. मोटेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या महिलेने फिर्याद दिली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत सूरज कुंडलिक जाधव (रा. जाधववाडी, ता. माळशिरस), सूरज दुर्योधन काळे (रा. 58 फाटा, ता. माळशिरस), सोमनाथ बाळू मोरे (रा. माळशिरस ) यांना अटक केले आहे. यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल हँडसेट, मोटारसायकल, चाकू, रोख रक्कम असा 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पंढरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत परमेश्वर आनंदा कोळी (वय 50 रा. बठाण, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) हे 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी गोपाळपूर ते बठाण या मार्गावरून जात होते. यावेळी राजा तिमा बंदपट्टे (रा. फुल चौक पंढरपूर), मनोज बाळू वाघमारे (रा. कालिका देवी चौक, पंढरपूर), अतुल रमेश शिंदे (रा. सावतामाळी मठा मागे, पंढरपूर), यांनी कोळी यांच्या वाहनासमोर आडवी गाडी लावून डोळ्यात चटणी टाकून 38 हजार रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली होती. या जबरी चोरीचा पंढरपूर पोलिसांना तपास करत तिन्ही संशयित आरोपीना अटक केली आहे.
नातेपुते पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिंगणापूर घाटाच्या हद्दीत लूटमार करणाऱ्या टोळीस जेरबंद केले आहे. यामध्ये गदर अशोक भोसले (वय 19), शिवाजी रामदास मदने (वय 22), समीर भारत जाधव (वय 22) तिघे रा. तावशी, ता. इंदापूर जि. पुणे. महावीर सुखदेव खोमणे, रणजित उर्फ पप्पू कुंडलिक बोडरे (दोघे रा. माळशिरस), प्रदीप उर्फ सोन्या आबा मदने, रोहन बाबू भोसले यांना जबरी चोरीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून अटक केली आहे.
मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत कमी दराने सोने देतो, अशी थाप मारून फसवणुक केली व तसेच लूटमार केली होती. यामध्ये मंद्रुप पोलिसानी मारुती बजेंद्र उर्फ मलेश माने, मलप्पा भुई या दोघांना अटक केली आहे. अटक केलेले दरोड्यातील सर्व संशयित आरोपी पोलीस कोठडीत असल्याची माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सोमवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.