सोलापूर - सध्या जगाला कोरोनाच्या विळख्याने वेढले आहे. देशासह आपल्या राज्यातही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या काळत सर्व लोक होम क्वारंटाईन आहेत. अशा काळात एक 14 वर्षाचा मुलगा पर्यावरण संवर्धनाचे काम करतोय. सध्या उन्हाच्या तीव्र झळा लागत असून, लावलेली झाडे जगवणे गरजेचे आहे. अनेकदा शाळेत आपल्याला 'झाडे लावा झाडे जगवा' असे सांगितले जाते. मात्र, त्याची कृती होताना दिसत नाही. मात्र, या १४ वर्षाच्या मुलाने हा संदेश कृतीत आणला आहे.
नदीवरून पाणी आणून जगवतोय झाडं
सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील केवड गावच्या एका 14 वर्षाच्या मुलाच्या कामाचे कौतुक होत आहे. भैरवनाथ विष्णू वाघमारे असे या मुलाचे नाव आहे. तो इयत्ता 8 वीच्या वर्गात सध्या शिकत आहे. तो दररोज नदीवरून खांद्यावर पाणी आणून झाडं जगवतोय. तो दररोज 10 झाडांना पाणी घालून, झाडं वाढवण्याचं काम करत आहे.
स्मशानभूमीतील झाडांचीही घेतोय काळजी
स्मशानभूमी म्हणलं की आपल्या मनात भीती उभी राहते. मात्र, हा १४ वर्षाचा भैरवनाथ न भीता स्मशानभूमीत असणाऱ्या झाडांना पाणी घालण्याचे काम करतोय. तसेच काळ भैरवनाथ मंदिराच्या परिसरात असणारी झाडेही भैरवनाथने जगवली आहेत. तसेच त्याने झाडांनी लाकडाचे कुंपनही केले आहे. त्यामुळे त्या झाडांचा जनावरांपासून बचाव होत आहे.
इंन्सपायर फाउंडेशनने दिली झाडे
केवडमध्ये इंन्सपायर फाउंडेशनने जवळपास ७० झाडे दिली होती. ती सर्व झाडे सध्या सुस्थितीत आहेत. त्या सर्व झाडांची जबाबदारी वेगवेगळ्या व्यक्तींकडे, काही मुलांकडे दिली आहे. ती मुले जबाबदारीने आपली कामे पूर्ण करत आहेत. त्यापैकी भैरवनाथ १० झाडांची योग्य पद्धतीने निगा राखत आहे. ही सर्व झाडे जगल्यास केवड १०० टक्के प्रदुषणुक्त गाव होण्यास मदत होणार आहे.
वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे
जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून पर्यावरण रक्षणाचे महत्व पटवून दिले आहे. पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे. पर्यावरण हा सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. जागतिक तापमान वाढीमुळे विविध प्रकारची संकटं येत असून, पृथ्वीची वाटचाल विनाशाकडे सुरू झालीय की काय? अशी चर्चा होतेय. दुष्काळ, अतिवृष्टी, भूकंप अशा एकामागोमाग एक नैसर्गिक आपत्ती येत आहेत. त्यातच जागतिक तापमान वाढीची समस्याही मोठी आहे. त्यामुळे अशा काळात सर्वांनी आपापल्या परिने पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे.